नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. जगायची इच्छा नाही असं म्हणत एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या कोटातील रामगंजमंडी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात तरुणाने स्वत:च्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी एकटाच असताना त्याने हे कृत्य केलं आहे. आता जगायची इच्छा नाही असं तरुणाने आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवलं होतं. यानंतर थोड्य़ावेळाने पुन्हा स्टेटस अपडेट केलं आणि त्यावेळी हा शेवटचा स्टेटस असं म्हटलं
तरुणाचे कुटुंबीय घरी परतले तेव्हा तरुणाच्या खोलीत गाणी सुरू होती आणि तरुण पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नंदकिशोर (21) असं या तरुणाचं नाव असून तो उंडवा गावातील रहिवासी होता. त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. गेल्या चार महिन्यांपासून तो बाईकच्या शोरूममध्ये काम करत होता. शुक्रवारी त्याचे आई-वडील आणि बहीण कामावर गेली होती. झोपायचं कारण सांगून तो शेतावर गेला नाही.
घरामध्ये गाणी लावली, स्टेटस अपडेट केलं आणि तरुणाने स्वत:ला संपवलं
कुटुंबीय सायंकाळी 6 वाजता घरी परतले तर त्यांनी पाहिलं की, मोबाईलवर गाणी सुरू होती. खोलीचा दरवाजा बंद होता. त्यानंतर नंदकिशोर गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होता. नंदकिशोरने दुपारीच गळफास घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण 3 ते 4 तासांपासून शेजारच्यांनी गाण्याचा आवाज येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृत तरुणाच्या जवळ सुसाईड नोट सापडलेली नाही. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर नोकरीतून मिळालेले पैसे घरात देत नव्हता. सर्व पैसे तो स्वत:च खर्च करीत होता.
तरुणाचं वारंवार घरातील सदस्यांसोबत भांडण व्हायचं. त्याच्या वडिलांवर कर्ज होतं. पोलिसांनी सांगितलं की, सुसाईड करण्यासाठी तरुणाने सोशल मीडियावर स्टेटस अपलोड केलं. पोलिसांकडून कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. त्याने आत्महत्ये आधी मूड ऑफ आहे असं स्टेटस देखील ठेवलं होतं. या घटनेने एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.