- सुरेंद्र राऊतयवतमाळ : जुन्या वादातून घरासमोर उभ्या असलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. या गुन्ह्यातील आरोपीला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.
बबलू विठ्ठलराव डोंगरे (३५, रा. तलावफैल, पंचशील चौक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २० ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता जुन्या वादातून महेश उर्फ बंटी अनिल गजभिये याचा चाकूने भोसकून खून केला. या घटनेपूर्वी आरोपी व मृतकाचा गांधी चौकात वाद झाला होता. त्यावेळी उपस्थितांनी त्या दोघांचे भांडण सोडविले. हाच राग डोक्यात घेऊन बबलू भटकत होता. त्याला महेश हा घराबाहेर हातपंपाजवळ उभा दिसला. याच संधीचा फायदा घेऊन बबलूने धारदार चाकूने महेशच्या छातीत दोन वार केले. महेशने आरडाओरडा केला असता, त्याची आई व भाऊ घराबाहेर धावून आले. आरोपी बबलूच्या तावडीतून महेशला सोडविण्याचा प्रयत्न केला. यात महेशची आई व मामा यांच्या हातालाही दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या महेशला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर काही तासांतच सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाने यांनी आरोपी बबलू डोंगरे याला अटक केली. सचिन गजभिये याच्या तक्रारीवरून कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करून शुभांगी गुल्हाने यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये रमा गजभिये, नितेश गजभिये व डॉ. शुभम मोंढे, घटनास्थळावरील पुरावे ग्राह्य मानून आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच २५ हजार रुपये दंड केला. या दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये मृतकाची आई रमाबाई हिला देण्याचा आदेश दिला आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील ॲड. अरुण ए. मोहोड यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. सचिन तायडे, ॲड. रंजित अगमे, कोर्ट पैरवी कढाणे यांनी सहकार्य केले.