जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मास्क लावायला सांगितला म्हणून त्याने थेट सरकारी कार्यालयावरच हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मास्क लावायला सांगितला म्हणून रागाच्य़ा भरात एका व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मॉस्कोमध्ये ही घटना घडली. या घटनेबद्दल मॉस्कोचे महापौर सर्जी सोब्यॅनिन यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली की या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. त्यांनी या व्यक्तीबद्दल कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही, तसंच या व्यक्तीच्या हल्ला करण्याच्या हेतूबद्दलही काही स्पष्ट केलेलं नाही. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
चार जण जखमी झाले असून तिघांची प्रक़ती गंभीर
जखमी झालेल्यांमध्ये एका दहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. हल्ला करणारी व्यक्ती ही 45 वर्षीय असून तो मॉस्कोचाच रहिवासी आहे, अशी माहिती मिळत आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून त्यामधील तिघांची प्रक़ती गंभीर आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणं तिथे अनिवार्य करण्यात आलं आहे. अशातच ही व्यक्ती मास्क न घालता शहरातील एका सरकारी कार्यालयात गेली, जिथे पासपोर्टसाठी अर्ज करणे, घरं आणि तत्सम मालमत्तेसंदर्भातली कागदपत्रं मिळवणे आणि इतर काही कामांसाठी मदत मिळवणे अशी कामं केली जातात. या कार्यालयात जात असताना प्रवेशद्वाराजवळच या व्यक्तीला सुरक्षारक्षकाने थांबवले.
खिशातून बंदूक काढली आणि सरकारी कार्यालयामध्ये गोळीबार केला
मास्क घातला नसल्याने सुरक्षारक्षकाने या व्यक्तीला मास्क घालण्यास सांगितलं. यामुळे 45 वर्षीय व्यक्ती संतापला. त्याने आपल्या खिशातून बंदूक काढली आणि सरकारी कार्यालयामध्ये गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात दोघे जण ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक बंदूक सापडली आहे. मात्र अशा प्रकारची बंदूक आणि हत्यारं जवळ बाळगणं यावर रशियामध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारची बंदूक बाळगण्याची परवानगी फक्त व्यावसायिक स्पोर्ट्स शूटर्सना देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.