Crime News: पत्नीची हत्या केली, उच्च न्यायालयाने पतीला या कारणावरून सोडून दिले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 10:44 AM2022-10-20T10:44:36+5:302022-10-20T10:45:30+5:30
पहिली पत्नी मिनाक्षीपासून वेगळे होत राधा नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. सणाच्या दिवशी जेवन बनविले नाही म्हणून त्याने पत्नीला मारहाण केली होती.
सणावाराच्या दिवशी पत्नीने जेवन बनविले नाही, या रागातून पतीने पत्नीची हत्या केली होती. २०१६ मधील हे प्रकरण होते. त्यावर सत्र न्यायालयाने २०१७ ला निकाल देत, आरोपी पतीला जन्म ठेपेची शिक्षाही सुनावली होती. या आरोपीला कर्नाटक हायकोर्टाने निर्दोष सोडून दिले आहे.
सुरेश असे या व्यक्तीचे नाव असून तो चिक्कमंगळुरू जिल्ह्यातील आहे. त्याने पहिली पत्नी मिनाक्षीपासून वेगळे होत राधा नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. सणाच्या दिवशी तो दुसरी पत्नी राहत असलेल्या घरी आला होता. परंतू राधा ही सणाच्या दिवशी दारू पिऊन झोपली असल्याचे त्याला दिसले. सण असूनही तिने काहीच जेवण बनविले नव्हते.. यामुळे त्याला संताप अनावर झाला. यातून त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले होते. तेथील सत्र न्यायालयाने त्याला २०१७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यावर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने म्हटले की, महिलेने जेवण तयार केले नव्हते, यामुळे त्याला असे अचानक पाऊल उचलण्यास उद्युक्त करण्यात आले. संतापाच्या भरात त्याने पत्नीला मारहाण केली. त्यात ती जखमी झाली, परंतू तिची हत्या करण्याचे त्याचा हेतू नव्हता, असे पुराव्यांवरून दिसत आहे. आरोपीचे कथित कृत्य आयपीसीच्या कलम 300 च्या अपवाद-1 च्या कक्षेत येते. महिलेचा मृत्यू 'हत्या म्हणून नव्हे तर अनवधानाने झालेला मृत्यू' होता आणि आयपीसीच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत नाही, असे बंगळुरू उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले.
आरोपीने आधीच सहा वर्षे आणि 22 दिवसांचा तुरुंगवास भोगला आहे, जो आयपीसीच्या कलम 304 अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे इतर कोणत्याही प्रकरणात आवश्यकता नसल्यास सुरेशची तात्काळ सुटका करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.