महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 99 वर्षीय महिलेवर तिची देखभाल करणाऱ्या व्यक्तीनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरामध्ये लावण्यात आलेल्या सिक्रेट कॅमेऱ्याने ही पोलखोल झाली. या भयंकर प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा महिलेच्या वागण्यात बदल जाणवल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिच्या रूममध्ये सिक्रेट कॅमेरा लावला. न्यायालयाने या व्यक्तीला बलात्कारासह अनेक आरोपांमध्ये दोषी ठरवत तुरुंगात पाठवलं आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. एका वृद्ध आजारी महिलेवर कोणी बलात्कार कसं करू शकतं? असा प्रश्न पडला आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, 48 वर्षीय फिलिप कॅरीचं घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित महिला डिमेंशियाचा सामना करत आहे आणि उपचारासाठी ब्लॅकपूल केअर होममध्ये राहते.
मागील काही दिवसांपासून तिच्या वागण्यात बदल जाणवत होता. ती कोणालाही जवळ येऊ देत नव्हती. कोणी तिला हात लावला तर ती घाबरत असे. इतकंच नाही तर ती कुटुंबातील सदस्यांनाही तिथून निघून जाण्यास सांगत असे. महिलेच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, 'महिलेच्या वागण्यात अचानक झालेला हा बदल पाहून आम्ही चिंतेत होतो. आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं, की अखेर याचं कारण काय आहे. यासाठी आम्ही तिच्या रूममध्ये सिक्रेट कॅमेरा लावला.
आम्ही जेव्हा फुटेज पाहिलं, तेव्हा हैराण झालो. आम्ही कधीच विचार केला नव्हता की एका वृद्धा आजारी महिलेसोबत असं काही घडू शकतं. फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे फिलिप कॅरीला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत म्हटलं की आता तो इतरांचं आयुष्य वाईट करू शकणार नाही. सोबतच त्यांनी अशा लोकांपासून सावध राहाण्याचं आवाहन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.