नवी दिल्ली - आजही हुंड्यासाठी अनेक ठिकाणी महिलांचा छळ केला जातो. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपा नेत्याच्या कुटुंबाने हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप आता सुनेने केला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. आशुतोष टंडन यांच्या भावाच्या सुनेने केला आहे. हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा दावा दिशाने केला आहे. दिशाने याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे.
दिशाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. "मी दिशा टंडन, लालजी टंडन यांची नातसून आहे. कॅबिनेट मंत्री आशुतोष टंडन यांच्या कुटुंबाकडून माझा हुंड्यासाठी छळ केला जात आहे. माझा गुन्हा नोंदवून घेतला जात नाही. मी अनेक ठिकाणी याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण आशुतोष टंडन मंत्रीपदावर असल्यामुळे माझी तक्रार कुणीही घेत नाही" असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. दिशाने शनिवारी संध्याकाळी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप
लखनऊचे दीर्घकाळ खासदार आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल राहिलेले लालजी टंडन यांची नातसून दिशा टंडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून त्यांना न्याय देण्याची विनंती केली आहे. दिशाने आशुतोष टंडन यांच्या कुटुंबावर तिचा मानसिक छळ केल्याचा, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. "बाबा (लालजी टंडन) यांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यांनी मला (दिशा) घरातून हाकलून देण्यात आले आणि मला माझ्या माहेरी जाण्यास सांगितले."मला त्याआधी खूप त्रास दिला गेला. आयुषने मला मारले आणि माझा हात तोडला" असं म्हटलं आहे.
11 डिसेंबर 2019 रोजी झालं होतं लग्न
दिशाने ट्विटमध्ये पीएमओ इंडिया, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप संघटन सरचिटणीस सुनील बन्सल आणि लखनऊ पोलिसांना टॅग केले आहे आणि आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. 11 डिसेंबर 2019 रोजी अमित टंडन यांचा मुलगा आयुष टंडनसोबत दिशाचं लग्न झालं होतं. अमित टंडन हे आशुतोष टंडन यांचे भाऊ आहेत. आशुतोष टंडन हे सध्याच्या युपी सरकारमध्ये शहरी विकास, शहरी सर्वांगीण विकास, शहरी रोजगार आणि गरीबी निर्मूलन मंत्री आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.