नवी दिल्ली - राजस्थानच्या बाडमेरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचललं असून आत्महत्या केली आहे. पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. त्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना हा भयंकर प्रकार समजला. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे नातेवाईक जेव्हा मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जात होते, तेव्हा मुलीच्या कपड्यांमध्ये एक कागद सापडला.
अंगावर काट आणणारी आणि हादरवून टाकणारी एक सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये धक्कादायक प्रकार आणि आरोपींची नावे लिहिलेली होती. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी नातेवाईकांकडून सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर सामूहिक बलात्कार झाला असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. रिको परिसरातील 16 वर्षीय तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती.आत्महत्येच्या दिवशी रात्री मुलीचे कुटुंबीय बाहेर गेले असता, मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुसाईड नोटवरून मिळाली माहिती
अंत्यसंस्कार करताना सापडलेल्या सुसाईड नोटवरून कुटुंबाला संपूर्ण घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. महेंद्र सिंह आणि एका अल्पवयीन मुलाने रविवारी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे आणि कोणालाही सांगितल्यास कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. मुलीकडे एक पानाची सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये "मी मरणार आहे, माझ्या सर्व वस्तू कोणालाही देऊ नका, मला मरायचे नाही, पण काय करू? लोक माझ्या वडिलांना ऐकवतील. माझी स्वप्ने अजूनही अपूर्ण आहेत. महेंद्र आणि त्याच्या मित्राने खोटं बोलून बाहेर बोलावलं आणि माझी बदनामी झाली" असं म्हटलं आहे.
"पापा मला माफ करा, मी काही चुकीचं केलं नाही"
"माझ्या आई आणि वडिलांना कोणी काही बोलू नका. पापा मला माफ करा आणि माझे कपडे आणि सर्वकाही योग्य ठिकाणी ठेवा. मी काही चुकीचे केले नाही...तुमची मुलगी... माझ्या मृत्यूचे कारण महेंद्र आणि त्याचा मित्र आहे" असं देखील म्हटलं आहे. सुसाईड नोट सापडल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. जिथे पोलिसांनी हा सामूहिक बलात्कार मानून पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला कक्षाचे एएसपी हजारीराम करत आहेत. सध्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.