रांची - झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात मॉब लिंचिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे ग्रामस्थांनी एका आदिवासी तरुणाला बंधक बनवून नंतर त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. जय मुर्मू असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सलगाडीह गावात घडली आहे.
मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार गावातील प्रमुख संजुल मुर्मू याच्या नेतृत्वाखाली कटकारस्थान रचून त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. त्यानंतर सोहराय सोहळ्या दिवशी तिच्या पतीला गावचा प्रमुख तसेच रमेश मुर्मू, चंदवा मुर्मू, सांझला मुर्मू, बंसी मरांडी यांच्यासह लाठ्याकाठ्या घेतलेल्या गावातीलच इतर महिला आणि पुरुषांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या जय मुर्मू याला गावातील प्रधानाच्या घरात बंधक बनवून ठेवण्यात आले.
प्रकृती बिघडू लागल्यावर या जय मुर्मू याला फरफटत आणू त्याच्या घरासमोर आणून फेकले. तिथे काही काळाने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला ओलीस ठेवून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान आमदार राजकुमार यादव आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचल्यावर सर्वजण तिथून पसार झाले.
माजी आमदार राजकुमार यादव यांनी एसडीपीओ मुकेश महतो यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. दरम्यान या घटनेवरून धनवारचे माजी आमदार राजकुमार यादव यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बाबूलाल मरांडी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच हे गंभीर प्रकरण दडपण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.