पाकिस्तानमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. पंजाब निश्तार रुग्णालयात तब्बल 500 हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. रुग्णालयात बेवारस स्थितीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाने या प्रकरणाची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे. निश्तार वैद्यकीय विद्यापीठाच्या निश्तार रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये मृतदेह उघड्यावर पडलेले दिसत आहेत. अनेक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहेत. बरेचसे मृतदेह रुग्णालयाच्या गच्चीत आढळले आहेत. या मृतदेहांचे अनेक अवयव काढण्यात आले आहेत. या प्रकरणी विभाग अधिकाऱ्याने निश्तार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. घटनेची नोंद गांभीर्याने घेण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं म्हटलं आहे. या धक्कादायक प्रकारामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.
या प्रकरणातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे सर्व मृतदेहांची चिरफाड करण्यात आली असून त्यांचे अवयव काढण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पत्र देण्यात आले, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास अहवाल तयार करण्यास सांगितले आहे, जो तीन दिवसांत या कार्यालयाला पाठवण्यात येईल. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पंजाबच्या आरोग्य विभागाने निश्तार रुग्णालयातील मृतदेहांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सहा सदस्यांची टीम तयार केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.