लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : बंबल डेटिंग ॲपवरून बँकेतील एका कर्मचारी तरुणीसोबत मैत्री केली. तिला मालदीवच्या ट्रिपची ऑफर दिली. त्यानंतर तिच्या घरी जाऊन ५० हजार रुपये घेत तिचा विनयभंग केला. परदेशवारीची मुदत निघून गेल्यावर हा तरुण महाठग असल्याचे उघड झाले. त्यानंतर संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.
हा प्रकार रहाटणी येथे ११ ते २६ मार्च या कालावधीत घडला. या महाठगावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून, मुंबई पोलिसांनी त्याला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. मॅडी सूर्या नावाचे यूझर नेम असलेला मुकेश ईश्वर सूर्यवंशी (३५, रा. कल्याणीनगर, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित तरुणीने रविवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी पीडित तरुणी ही एका बँकेची कर्मचारी आहे. आरोपी मुकेश सूर्यवंशी याने बंबल या डेटिंग ॲपवरून फिर्यादीशी मैत्री केली. इन्स्टाग्राम मेसेज आणि फोनद्वारे संपर्क साधला. विविध कंपन्यांचा मालक असल्याचे सांगून फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर माझ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची मालदीवला ट्रिप नेणार आहे, असे सांगून आरोपीने फिर्यादीला तिच्या घरी जाऊन ऑफर केली. या ट्रिपसाठी फिर्यादीकडून पासपोर्टची झेरॉक्स आणि ५० हजार रुपये नेले. तसेच गैरवर्तन करत तरुणीचा विनयभंग केला आणि शरीरसुखाची मागणी केली. ट्रिपची तारीख उलटून गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
पुणे, मुंबईसह परदेशातही गुन्हे दाखलnमुकेश सूर्यवंशी याच्याविरोधात पिंपरी- चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे यासह इतरही जिल्ह्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.nमुकेश सूर्यवंशी हा काही देशांमध्ये जाऊन तेथील भारतीय नागरिकांशी संपर्क साधायचा. त्यांनादेखील विविध आमिषे दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडायचा आणि त्यांना गंडा घालायचा.
स्वस्तात सोने खरेदी-विक्रीच्या आमिषातून फसवणूक स्वस्तात सोने मिळवून देतो, सोन्यामध्ये गुंतवणूक करा, असे सांगून, तसेच माझ्या परदेशात काही कंपन्या आहेत. तेथून कमी किमतीत गोल्ड काॅइन आणून देतो, अशी प्रलोभने दाखवून मुकेश सूर्यवंशी सामान्यांना गंडा घालतो. यात महिलांची संख्या जास्त आहे. नाशिक, धुळे, अहमदनगर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांचीही त्याने फसवणूक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून त्यांनाही फसविल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.
महिलांनो सतर्क राहासहज फसतात म्हणून महिलांशी संपर्क साधण्यावर आरोपी मुकेश भर देत होता. काही महिलांना त्यांच्या मुलांसह स्वीकारण्याची तयारी दर्शवत त्यांचीही फसवणूक केल्याचे काही प्रकार समोर येत आहेत. अशा महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोकड, दागिने घेऊन मुकेश ‘गायब’ व्हायचा. महिलांनी सतर्क राहून कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.