भातसानगर : शहापूर तालुक्यातील किन्हवली-डोळखांब पोलीस ठाणे हद्दीतील रुमालपाडा येथे झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पाेलिसांना यश आले आहे. चाेरी उघड हाेऊ नये, यासाठी चुलत भावानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मुख्य आराेपी आणि चाेरीचे दागिने खरेदी करणाऱ्या दाेघांना अटक करण्यात आली आहे.साकडबाव पठारावरील रूमालपाडा येथे १ जूनला जयेश हरिश्चंद्र खडके व विशाल जगन खडके या चुलत भावांनी शेजारच्या घरातील दागिन्यांची चोरी केली हाेती. मात्र, विशाल याने हे दागिने परत करण्याचा आग्रह जयेश याला केला. मात्र, असे केले तर आपण चाेरी केल्याचे उघड हाेईल, या भीतीने जयेश याने ८ जूनला विशाल याचा खून केला. या प्रकरणात संशयावरून जयेश याला १५ जूनला चोरीच्या प्रकरणात अटक केली. पाेलीस तपासात त्याने आपणच विशालची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानुसार, १६ जूनला जयेश याच्यावर गुन्हे दाखल झाले. तर, चोरीचे दागिने वासिंद येथील मित्र निखिल राठोड याच्या सहकार्याने वासिंद येथील सुभद्रा ज्वेलर्सचे मालक हनुमंत चौधरी यांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी वासिंद येथील निखिल राठोड व हनुमंत चौधरी यांच्यावर गुन्हा नाेंदवून त्यांना शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणात डोळखांब पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विनोद म्हस्के यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
Crime News: चाेरी उघड हाेऊ नये म्हणून चुलत भावाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:23 AM