नवी दिल्ली - बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नशेने एका शाळकरी मुलाचा बळी घेतला आहे. नशेमुळे कर्जबाजारी झालेल्या एका आठवीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. राहत्या घरामध्ये मुलाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुलाच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नशेतून येणारं नैराश्य आणि कर्जाचा डोंगर यामुळे विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुझफ्फरपूर भागात राहणाऱ्या आदित्य कुमार या 16 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला व्यसन लागलं होतं. काही मित्रांसोबत तो ही नशा करत असे. तो त्याच्या मावशीकडे शिक्षणासाठी राहायला होता. आठवीत शिकणाऱ्या आदित्यला अंमली पदार्थांचं व्यसन जडलं होतं. त्यासाठी तो त्याच्या मित्रांकडून पैसे उधार घेत असे. आतापर्यंत त्याने अनेकदा असे पैसे उधार घेतले होते आणि मोठं कर्ज केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वीजेच्या वायरने घेतला गळफास
आदित्यचं व्यसन सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याची माहिती त्याच्या मावशीने दिली आहे. त्याला खूप समजावण्यात आलं पण तरीही तो ऐकत नव्हता. एका व्यसनमुक्ती केंद्रावरही त्याला नेण्यात आलं होतं. तिथं त्याचं काऊन्सिलिंग करण्यात आलं होतं. मात्र त्याचा काहीच परिणाम त्याच्यावर झाल्याचं दिसलं नाही. नशा करणं आणि लोकांकडून पैसे घेणं त्याने सुरूच ठेवलं होतं. आदित्य चार पाच दिवसांपासून खूप अस्वस्थ झाला असल्याची माहिती त्याच्या मावशीने दिली आहे. घटनेच्या दिवशी त्याने वीजेच्या वायरने गळफास घेतला.
रात्री जेवण न करताच आदित्य त्याच्या खोलीत झोपायला गेला होता. सकाळी बराच वेळ खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे मावशीने त्याला हाक मारायला सुरुवात केली. पण आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे तिने खिडकीचा पडदा बाजूला करून आत पाहिलं. तेव्हा आदित्य पंख्याला लटकलेला अवस्थेत दिसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबीय आणि शेजारी एकत्र आले आणि दरवाजा तोडून आदित्यचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.