मुंबई : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधांतून सहायक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) चालकानेच पत्नीच्या प्रियकराची हत्या करत त्याचे चार तुकडे केल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने चालक पोलीस नाईक शिवशंकर गायकवाड (४५) याला पत्नी मोनालीसह अटक केली आहे. तर, मुंडके अद्याप सापडले नसून त्याचाही तपास सुरू आहे.
सायन विभागाच्या एसीपींच्या कार्यालयाबाहेर ३० सप्टेंबर रोजी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कक्ष ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा समांतर तपास सुरू केला. मुंडके नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सुरुवातीला मृतदेहाच्या हातावरील टँटूवरून पथकाने तपास सुरू केला.पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. परिसरातील मोबाइल टाॅवर लोकेशनच्या मदतीने दादा नावाच्या व्यक्तीचे लोकेशन तेथे आढळून आले, पोलिसांनी नंबर ट्रेस केला असता, तो सोलापूरचा असल्याचे समोर आले. पोलीस चौकशीत दादाही गायब असल्याचे समोर येताच तोच धागा पकडून तपास सुरू झाला. दादाच्या मोबाइलच्या काॅल रेकॉर्डमध्ये शिवशंकर आणि मोनाली संपर्कात असल्याचे समोर येताच, त्यांना ताब्यात घेत चौकशी करताच त्याने गुह्याची कबुली दिली.वरळी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या शिवशंकर याचे पत्नी मोनाली हिच्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून वारंवार भांडण व्हायचे. शिवशंकरच्या त्रासाला कंटाळून पत्नी अक्कलकोटला निघून गेली. तेथेच तिची जगदाळेसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघे सोबत राहू लागले. त्यानंतर घर सोडून गेलेली पत्नी नुकतीच घरी आली होती. दोघांमध्ये चांगले सुरू असताना त्याला जगदाळेबाबत समजताच त्याचा संशय खरा ठरला. यातून दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. त्यावेळी शिवशंकर स्वत:वर चाकूहल्ला करून घेत असताना मोनालीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या हातावरही चाकूचे वार झाले.त्यानंतर शिवशंकरने जगदाळेचा काटा काढण्याचा कट रचला. दादा जगदाळे हा ओळखीचा असल्याने शिवशंकरने त्याला गोड बोलून मुंबईला आणले. मुंबईत त्याची निर्घृण हत्या केली. शिवशंकरने प्रियकराची हत्या केल्याचे समजताच तिलाही धक्का बसला. हे प्रकरण घरापर्यंत येऊ नये, यासाठी तिनेही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शिवशंकरला मदत केली. दोघांनी जगदाळे याचा मृतदेह २९ सप्टेंबरच्या रात्री सायनच्या एसीपी कार्यालयाबाहेर टाकला. पुरावे नष्ट करण्यासाठी तो जाळण्याचाही प्रयत्न केला. कुणालाही संशय येऊ नये, म्हणून शिवशंकर नियमित कामावर हजर झाला होता. दोघांनाही १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शीर फेकले कचऱ्यात- आरोपीने दादा जगदाळे याचे मुंडके कचऱ्यात फेकल्याची माहिती गुन्हे शाखेला दिली आहे. सध्या पथक याच मुंडक्याचा शोध घेत आहेत.- या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांपुढे मुंडक्याचे शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.