पाटणा - प्रेम आंधळं असतं मात्र गोळी आंधळी नसते. दरम्यान, प्रेमात आंधळ्या झालेल्या एका प्रियकराने गोळ्यांवर मरणाऱ्यांची नावं लिहिली. त्यानंतर प्रेयसीच्या घरात घुसून कुटुंबीयांना ओलीस धरले. त्यानंतर त्याने आपली मागणी त्यांच्यासमोर मांडली. पोलीसही या कुटुंबाला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक तास हा थरार सुरू होता.
या तरुणाने गोळ्यांवर त्या ज्यांच्यावर झाडायच्या आहेत त्यांची नावं लिहिली. पहिली गोळी - प्रेयसीच्या नावावर, दुसरी गोळी - तिच्या वडिलांच्या नावावर, तिसरी गोळी तिच्या भावाच्या नावावर, चौथी गोळी - स्वत:च्या नावावर. अशी सारी व्यवस्था करून हा तरुण हातात पिस्तूल घेऊन प्रेयसीच्या घरात घुसला. सोबत एक दोरी, पेट्रोलच्या दोन बाटल्या, साखळी, लायटर अशा इतर वस्तूही घेतल्या.
डिलिव्हरी बॉय बनून आलेला हा तरुण दरवाजा उघडताच घरात घुसला. त्याने सगळ्यांना ओलीस धरले. तसेच काही हालचाल केली तर थेट गोळी झाडण्याची धमकी दिली. ओलीस धरलेल्या कुटुंबीयांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणाकडे जीवघेणी हत्यारं असल्याने त्यांचा नाईलाज झाला. सुरुवातीला हा तरुण असं का करतोय हे त्यांना समजलं नाही. मात्र नंतर त्यांच्या मुलीनं या तरुणाशी असलेली मैत्री तोडून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केल्याने हा तरुण असं वागत असल्याचं समजलं आणि त्यांना धक्काच बसला.
दरम्यान, दिल्लीला असलेल्या या कुटुंबातील मुलीने पोलिसांना फोन करून माहिती दिली होती. त्यामुळे पोलीस साध्या वेशात घराबाहेर दाखल झाले. दरम्यान, काही पोलीस पत्रकार असल्याचे सांगून घरात घुसले. तर बाहेरून पोलीस बंदुका रोखून उभे राहिले. दरम्यान, दिवसभर चाललेल्या नाट्यानंतर हा तरुण थकला. त्याने ग्लुकोजची मागणी केली. हीच संधी साधत पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर या तरुणाला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अखेर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या तरुणाने सांगितले की, या घरातील एका मुलीसोबत त्याची मैत्री होती. तिने त्याच्याशी विवाह करण्याचे वचनही दिले होते. मात्र नंतर तिने इग्नोर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त होऊन हे कृत्य केल्याचे या तरुणाने सांगितले.