मुंबई : घराच्या बदल्यात पैसे घेऊनदेखील ग्राहकांना घराचा ताबा न देता कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील ५ विकासकांना बेड्या ठोकल्याने खळबळ उडाली आहे. तीन स्वतंत्र गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तक्रारदार रमाकांत रामचंद्र जाधव व त्यांच्या शिवालीक व्हेंचर्स प्रा. लि. कंपनीस जानेवारी २००८ ते एप्रिल २००८ दरम्यान आरोपी मंगेश तुकाराम सावंत (६०) याने पवई येथील प्रकल्पात जाधव यांना आधी १५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पुढे, बांधकाम पूर्ण न करता, त्यांची फसवणूक केली. याप्रकरणात सावंत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात, तक्रारदार अनिल हळदणकर यांनी मेसर्स राज आर्केड ॲण्ड एन्व्हेलर्स प्रा. लि च्या संचालककडुन १४ फेब्रुवारी २०१९ रोजी राज शिवगंगा को हौ. सोसायटीमधील फ्लॅट नंबर २०६ ही सदनिका कायदेशीरपणे रजिस्टर करून ७६ लाख रुपयांना विकत घेतली.
चौकशीत तो फ्लॅट आरोपींनी आधीच विकून त्यावर कर्ज घेतले असल्याचे समोर आले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी चारकोप पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. अनिल यांच्यासह आणखीन सहा जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर येताच याप्रकरणात एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या रिट पीटीशनमधील आदेशानुसार हे गुन्हे पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे विभागात वर्ग करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी राजेश दामजी सावला (५३), अश्विन मधुसुदन मिस्त्री (५९) आणि जयेश व्रजलाल रामी (६३) हे तिघे जण ओळख लपवून राहत होते. आर्थिक गुन्हे शाखेने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तिघांना ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत.
१०० हून अधिक फ्लॅटधारकांची फसवणूक तक्रारदार हरनित सिंग अरविंदपालसिंग गांधी तसेच अन्य २९ फ्लॅट खरेदीधारकांनी आरोपी जयेश ठोकरशी शाह (५९) याच्या ओशिवरा तसेच अंधेरीतील हौऊसिंग प्रकल्प ‘गौरव लिजंट’ या प्रकल्पामध्ये १० वर्षांपूर्वी फ्लॅट विकत घेतले. त्या बदल्यात त्यांनी शाहला १२ कोटी १४ लाख ६६ हजार ५३६ रुपये देऊन फ्लॅट खरेदीचे ॲग्रीमेंट केले होते. प्रत्यक्षात शाहने त्या प्रकल्पाच्या पूर्ण बांधकामाच्या परवानग्या घेतल्या नाहीत. शिवाय बांधकामही पूर्ण केले नाही. त्यामुळे फ्लॅट धारकांना ताबा न देता फसवणूक केली. अशाच प्रकारे १०० पेक्षा अधिक फ्लॅट खरेदीधारकांची यामध्ये फसवणूक झाल्याची शक्यता आहे. तसेच, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. १७ जून रोजी कांदिवली येथील कार्यालयातून त्याला ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शाह विरोधात फसवणुकीचे १० गुन्हे दाखल आहेत.