नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एका लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यात एसीबीला यश आलं आहे. उदयपूर अँटिकरप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने पालीमध्ये ही कारवाई केली. यगदत्त विधुवा नावाच्या एका PWD विभागातील अधिकाऱ्याला एसीबीने 13 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. मिळालेल्या माहितीनुसार, यगदत्त विधुवा हा पाली NHIDCLचा एक्सईएन (XEN) आहे. हा अधिकारी आपल्याकडून लाच मागत असल्याची तक्रार परिसरातील पॅकेज-2 या प्रकल्पाचे मॅनेजर विमल कुमार यांनी दाखल केली होती.
लाचखोर अधिकाऱ्याच्या पत्नीने देखील धक्कादायक खुलासा केला आहे. माझा पती चारित्र्यहीन असल्याचं म्हटलं आहे. पाली नॅशनल हायवेवर या कंपनीचा 188 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट सुरू आहे. यासाठी कंपनीची 75 लाख रुपयांची हँड रिसिट रिलीज करण्यासाठी यगदत्तने लाच मागितली होती. प्रोजेक्ट मॅनेजर विमल कुमारने दिलेल्या माहितीनुसार, यगदत्तने यापूर्वीही त्याच्याकडून विविध गोष्टींची मागणी केली होती. बिल पास करुन देण्यासाठी आणि कामात अडथळा आणू नये म्हणून यापूर्वी यगदत्तने अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप म्हणजेच मॅकबुकही मागितला होता. तसंच, यापूर्वी वेळोवेळी त्याने पैसेही मागितले होते.
जसंजसं विमल कुमार त्याच्या मागण्या पूर्ण करत होता, तसंतसं यगदत्तची हाव वाढत गेली. अखेर विमल कुमारने एसीबीकडे धाव घेत, यगदत्त विरोधात तक्रार दाखल केली. यगदत्तला ताब्यात घेतल्यानंतर एसीबीचे पथक त्याच्या जयपूरमधील घरी गेले. यावेळी यगदत्तच्या पत्नीने आपण त्याच्याशी चार वर्षांपूर्वीच संबंध तोडल्याचं सांगितलं. सध्या त्यांच्या घटस्फोटाची केस कोर्टात सुरू असल्याचंही तिने स्पष्ट केलं. यासोबतच यगदत्तच्या पत्नीने आपला पती चारित्र्यहीन असल्याचंही म्हटलं.
एसीबीच्या अधिकाऱ्यांना या घरातून कोणतंही महत्त्वाचं सामान मिळालं नाही. विमल कुमारने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी विमलला यगदत्तने सांगितल्याप्रमाणे करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विमल कुमार यगदत्तने मागितलेले 13 लाख रुपये घेऊन हायवेवर असलेल्या एका हॉटेलमध्ये बोलवले. या ठिकाणी यगदत्तने मॅनेजर विमलकडून पैसे घेताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच याचा अधिक तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.