- नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छापखान्यात निर्मिती केलेल्या कोऱ्या करकरीत नोटा थेट हवाला रॅकेटमध्ये सापडल्यामुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे. तपासात बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच या हवाला रॅकेटमुळे खळबळ उडाली आहे.
भारतीय चलनी नोटा छापण्याचा कारखाना नाशिक आणि देवासमध्ये आहे. येथे छापण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयांतून देशभरातील विविध लोकेशन्सवरील करन्सी चेस्ट आणि कॉईन डेपोमध्ये पाठविल्या जातात. तेथून या नोटा इतर बँकांमध्ये पाठविल्या जातात. यावेळी या नोटांच्या बंडलांचे विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केलेले असते. हे पॅकिंग (आवरण) काढून संबंधित बँका त्यावर आपल्या बँकेचे कागदी आवरण व शिक्का मारून त्या ग्राहकांच्या हातात ठेवतात.
पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी नेहाल वडालीयाच्या सदनिकेत छापा घातला. तेथे गोंदियातील हवाला व्यावसायिक शिवकुमार दिवानीवाल तसेच वर्धमान पच्चीकार हेसुद्धा होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चार कोटी २० लाखांचे घबाड जप्त केले. विशेष म्हणजे, नोटांच्या या बंडलांतील काही बंडलांवर थेट नोटा छपाईच्या कारखान्यासारखे दिसणारे पांढरे पॅकिंग लावलेले आहे. ते पाहून पोलीस अधिकारी अचंबित झाले आहेत. त्याचमुळे या नोटा छापखान्यातून थेट हवाला व्यावसायिकांकडे कशा पोहोचल्या, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या नोटा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून गोळा केल्याचे प्राथमिक चौकशीत उपरोक्त हवाला व्यावसायिकांनी पोलिसांना सांगितले आहे. हे व्यापारी कोण आहेत, त्यांचा काय व्यवसाय आहे, त्याचा तपास आता पोलीस करत आहेत.
नोटा बाहेर पोहोचल्याच कशा?छापखान्यात नोटांच्या बंडलवर लावले जाणारे पॅकिंग आणि कारवाईत सापडलेल्या नोटांवरील पॅकिंग मिळतेजुळते असले तरी ते खरे की खोटे, हे स्पष्ट झालेले नाही. हवालाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर होतो. त्यामुळे हवालातून आलेल्यांमध्ये नकली नोटा किती, त्याचा कुणी हिशेब ठेवत नाही. त्याचमुळे थेट छापखान्यातून हवालावाल्यांकडे आलेल्या या नोटा नकली आहेत की असली, असा प्रश्न आहे. नोटा असली असतील तर त्या थेट छापखान्यातून हवालावाल्यांकडे कशा पोहोचल्या, असाही प्रश्न उपस्थित होतो.