राजस्थान - कुख्यात गँगस्टर जीतू बोरोदा याची बुधवारी रात्री अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह जयपूर जिल्ह्यातील सीमेवर फेकण्यात आला. हत्या झालेल्या गँगस्टरविरोधात विविध ठाण्यांमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. जीतू याचा याच महिन्यात विवाह होणार होता. मात्र तत्पूर्वीच त्याची हत्या करण्यात आली. राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात झालेल्या या गँगवॉरनंतर पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. जीतूचा मृतदेह जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे.
दौसाचे पोलीस अधीक्षक राजकुमार गुप्ता यांनी सांगितले की, कारमधून आलेल्या बदमाशांनी बुधवारी रात्री गँगस्टर जीतू बोरोदा याचं बीघावास येथून अपहरण केलं. त्यानंतर जीतूला मारहाण करून त्याच्या पायामध्ये एकापाठोपाठ एक आठ गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी जीतूचा मृतदेह बस्सी येथील बांसखोजवळ रस्त्यावर फेकून दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गँगस्टर जीतू बोरोदा बुधवारी रात्री दौसा शहरात भोजन केल्यानंतर लालसोटकडे जात होता. त्यावेळी बीघावास येथील वळणावर काही गुंडांसोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर तो बोरोदा गोटेलाव रोडच्या दिशेने आला. तिथे पु्न्हा आलेल्या गुंडांनी जीतू बोरोदाच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेत जीतू गंभीर जखमी झाला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह रस्त्यावर निपचित पडलेला सापडला. दरम्यान, या हत्येमागे प्रॉपर्टीचा वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.