नवी दिल्ली - ओडिशामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षता विभागाने शुक्रवारी सुंदरगड अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी बिस्वजित मोहापात्रा (Biswajit Mohapatra) यांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता आढळली आहे. ओडिशा दक्षता विभागाने 3 लाख रुपये, दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवी आणि इतर स्थावर मालमत्ता शोधून काढल्या आहेत.
मोहापात्रा यांचे रुद्रपूर, बलियंता येथील निवासी घर, नयापल्ली, भुवनेश्वर येथील सदनिका, मूळ गाव रेडहुआ येथील घर, जगतसिंगपूरच्या जडातिरा येथील नातेवाईकांचे घर, सुंदरगड शहरातील अधिकृत निवासस्थान, सुंदरगड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत कक्ष आणि निवासस्थानाची झडती सध्या सुरू आहे. दक्षता विभागाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, भुवनेश्वरमध्ये एक दुमजली इमारत आणि एक फ्लॅट, 10 भूखंड आणि 2 कोटी रुपयांहून अधिक बँक ठेवी, विमा आणि इतर गोष्टी सापडल्या आहे.
छापेमारीत 3 लाखांहून अधिक रोख आणि 350 ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे. तसेच म्युचल फंडमध्ये 18 लाख गुंतवले आहेत. याशिवाय महापात्रा यांनी नुकताच भुवनेश्वरमधील बलियंता येथे त्यांच्या पत्नीच्या नावाने सिमेंटचा व्यवसाय सुरू केला होता. अहवालानुसार, दक्षता विभागाची वित्त शाखा गोदामातील सिमेंट साठ्याचा तपास आणि त्याचे मूल्यांकन केले जात आहे. य़ा घटनेने एकच खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.