नवी दिल्ली - राजस्थानमध्ये गुन्हेगारी आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नागौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक शोषण आणि बलात्काराला बळी पडलेल्या एका मुलीने चार वर्षांनी आपलं दु:ख सांगितलं आहे. याप्रकरणी रविवारी नागौर येथील पंचोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, पीडितेवर 2018 आणि 2019 मध्ये शाळेच्या फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टरने दोनदा बलात्कार केला होता. या घटनेनंतर मुलीला मोठा धक्का बसला. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती नववी आणि दहावीत होती तेव्हा इंस्ट्रक्टरने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. आपल्या बहिणीसोबतही आता हा व्यक्ती असेच वाईट कृत्य करत असल्याचे मुलीला समजताच तिने हिंमत दाखवली आहे. आपल्यासोबत घडलेल्या भयंकर प्रकाराची माहिती कुटुंबाला दिली आहे. यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या काकांनी एफआयआर दाखल केला असून, आरोपीचे नाव हरी राम (30) असे आहे. त्याने मुलीला वर्गात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ती दहावीत असताना आरोपीने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पंचोरी पोलीस स्टेशनचे स्टेशन हाउस ऑफिसर अब्दुल रौफ यांनी मुलगी घाबरलेली आणि अस्वस्थ होती. त्यामुळे तिने घरी सांगण्यापेक्षा शाळा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी शाळा सोडल्यानंतर तिच्या पालकांसोबत राहत होती.
5 मार्च रोजी याच शिक्षकाने मुलीच्या बहिणीचा विनयभंग केल्याचं समजताच तिला धक्का बसला. आपल्या बहिणीची आपल्यासारखीचं अवस्था होऊ नये म्हणून तिने तिच्या आई-वडिलांना हा धक्कादायक प्रकार सांगितला. शेवटी कुटुंबात चर्चा करून मुलगी तिच्या काकांसह आमच्याकडे आली आणि गुन्हा दाखल केला. एसएचओने सांगितले की, पोलिसांनी दोन्ही मुलींचे जबाब नोंदवले आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.