नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता बिहारमध्ये घडली आहे. दानापूरमध्ये एका व्यक्तीने संतापाच्या भरात आपल्या मेव्हणीवर चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला नातेवाईकांनी तातडीने पालीगंज उपविभागीय रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाची प्रकृती चिंताजनक आहे. उमाची चूक एवढीच होती की तिने काही दिवसांपूर्वी तिच्या बहिणीचा नवरा सोनू कुमारला तिच्या बहिणीशी म्हणजेच लक्ष्मीशी बोलायला दिले नाही. सोनू कुमारने वारंवार फोन करूनही मेव्हणी बायकोसोबत बोलायला देत नव्हती. 22 वर्षीय मेव्हणीच्या या वागण्याने त्याला प्रचंड राग आला आणि त्याने मेव्हणीला धडा शिकवण्याचे ठरवले.
उमाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नौबतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कर्जा गावातील रहिवासी सोनू कुमारची पत्नी लक्ष्मी हिला 20 दिवसांपूर्वी तिची बहीण उमा प्रसूतीसाठी खासगी दवाखान्यात घेऊन आली होती. याबाबत सोनूला सासरच्या मंडळींनी माहिती दिली. प्रसूतीनंतर क्लिनिक ऑपरेटरने डिस्चार्ज पेपरसह बिल लक्ष्मीला दिले. मोठी रक्कम पाहून लक्ष्मीची बहीण उमा हिने बहिणीचा नवरा सोनूला क्लिनिकचे बिल भरण्यासाठी पैसे पाठवण्यास सांगितले. मात्र सोनूने पैसे देण्यास नकार दिला.
सोनूच्या बेजबाबदार वागण्याने चिडलेल्या उमाने त्याचा नंबर फोनच्या ब्लॉक लिस्टमध्ये टाकला. दुसऱ्या क्रमांकावरून फोन करूनही सोनूला पत्नीशी बोलता येत नव्हते. मेव्हणीच्या या वृत्तीचा सोनूला राग आला आणि त्याने सोमवारी संध्याकाळी सासरी येऊन तिला धमकी दिली. सासरच्यांनी सोनूला खडेबोल सुनावले, त्यामुळे त्याचा राग शिगेला पोहोचला. यानंतर सोनूने खिशातून चाकू काढून उमावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात उमा गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपी सोनू फरार आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.