मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलिसांकडे एका महिलेविरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, प्रकरणाचा तपास सध्या क्राईम ब्रँचकडून करण्यात येत आहे. धनंयज मुंडेंकेडे एका परिचित महिलेने पाच कोटी रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास बलात्काराची धमकी देण्याची धमकी या महिलेने दिली होती. दरम्यान, धनंजय मुंडेंना धमकी देणारी महिला कोण असावी, याबाबत आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान एका परिचित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपयांचं दुकान आणि एक महागडं घड्याळ मागितल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्याची तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, महिलेने केलेल्या मागणीनंतर धनंजय मुंडे यांनी सदर महिलेला परिचिताकरवी कुरियरच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईल पाठवला होता. पण या महिलेने ५ कोटींसाठी तगादा लावला त्यामुळे अखेरीच धनंजय मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सदर महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.