नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पीलीभीत (Pilibhit) जिल्ह्यात पीडब्ल्यूडीच्या (PWD) इंजिनिअरच्या घरावरील छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळाल्याचं समोर आलं आहे. इंजिनिअरजवळ पोलिसांना मोठं घबाड सापडलं आहे. साधारण 41 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. इंजिनिअर विरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कॅश जप्त केल्यानंतर आता पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीलभीत जिल्ह्यात तैनात लोक बांधकाम विभागातील प्रांतीय खंडाचे इंजिनिअर मुकेश कुमार विरोधात वारंवार तक्रारी येत होत्या. तक्रारीनंतर तैनात इंजिनिअर मुकेश कुमारच्या पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊस स्थित सरकारी निवासस्थानी छापेमारी केली. यादरम्यान मुकेश कुमारच्या सरकारी निवासस्थानी 40,99,300 रुपयांची कॅश सापडली. प्राथमिक तपासात मुकेश कुमार याने हे पैसे स्वत:चे असल्याचे सांगितले. मात्र यासंदर्भातील कोणतेही कागदपत्रं त्याच्याजवळ नव्हते. याबाबत तो उत्तरही देऊ शकले नाही.
इंजिनिअर विरोधातील अनेक तक्रारींनुसार तपास केला जात आहे. निवडणुकीदरम्यान झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं समोर आलं आहे. मुकेश कुमार याच्याकडील पैशांचा उपयोग निवडणुकीसाठी करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. त्याला या पैशांचा स्त्रोत कुठला आहे हे सिद्ध करण्यासाठी काही वेळ देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.