- पंकज पाटीलअंबरनाथ - हत्त्या करून तलावात युवकाचा मृतदेह फेकणाऱ्या अनोळखी आरोपींचा तपास लावण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. तलावात मृतदेह फेकताना वापरलेल्या वायरच्या आणि साडीच्या तुकड्यावरून आरोपींचा छडा लागल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. अटक करण्यात आलेल्यामध्ये एका आरोपीसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
उल्हासनगरच्या हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या विशाल राजभर याची हत्त्या करून अंबरनाथच्या जावसई येथील तलावात त्याचा मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याची घटना ४ ऑगस्ट 2022 रोजी घडली होती.याप्रकरणी रोशन साहनी याला अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपींचा शोध सुरु आहे.विशाल राजभर रहात असलेल्या ठिकाणी किरकोळ कारणावरून त्याची वादावादी झाली होती, अधिक चौकशी केली असता विशाल राजभर याला सचिन चौहान याने त्याच्या साथीदारांसह जीवे ठार मारून त्याचा मृतदेह तलावात फेकून दिल्याचे या घटनेतील आरोपी रोशन सहानी याने सांगितल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
मुख्य आरोपींना मदत करणारा रोशन सहानी आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आले आहे. या घटनेत पाच जणांचा समावेश असून अन्य तीन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशाला रवाना करण्यात आले आहे. मयत विशाल राजभर आणि मुख्य आरोपी सचिन चौहान यांच्यात जुने वाद होते. याचा राग मनात धरून सचिन चौहान याने अजय जैस्वार, रोशन सहानी, समीर सिद्दिकी उर्फ छोटा बाबू आणि एका अल्पवयीन मुलाच्या साथीने विशाल राजभर याला अंबरनाथच्या ऑर्डीनन्स कंपनी परिसरातील पडक्या खोल्यांजवळ लोखंडी रॉडने शरीरावर मारहाण करून मारले, त्यात तो मरण पावला होता. नंतर विशालचा मृतदेह एका गोणीमध्ये तारेच्या वायरने आणि साडीच्या तुकड्याच्या सहाय्याने बांधून , दगडी गोण्याबांधून तलावात फेकून देण्यात आला. या प्रकरणी रोशन सहानी याला अटक केली असून सचिन चौहान, अजय जैस्वार, समीर सिद्दीकी या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशमध्ये रवाना झाले आहे.