नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका माजी सैनिकाचा हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. हातात बंदूक घेऊन त्याने पत्नी आणि आपल्या मुलांना घरामध्ये बंदुकीचा धाक दाखवून बंदिस्त केलं. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आपल्या पत्नीच्या भावावर गोळी देखील झाडली. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आहे. कधी हातात चाकू तर कधी बंदूक घेऊन तो जीवे मारण्याची धमकी देत होता. जवळपास दहा तास हा भयंकर प्रकार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही घटना घडली आहेय यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बहिणीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या भावावर माजी सैनिकाने गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली. गोळी झाडल्यानंतर त्याने स्वत:ला पत्नी आणि दोन मुलांसह घरात कोंडून घेतलं. तर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तर घराचे दार बंद होते आणि आरोपी माजी सैनिक हा घरात शस्त्र घेऊन फिरत होता.
पोलिसांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता गेट बंद असल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत गेट उघडले नाही. शेवटी पोलिसांनी यश आलं आणि त्यांनी पत्नी, मुलांना सुखरुपरित्या बाहेर काढलं आहे. संजय शुक्ला हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. ते नैनी येथील कनैला गावात राहत आहेत. संजय शुक्ला आणि सासरच्या लोकांमध्ये काही कारणावरून भांडण सुरू आहे. पती-पत्नीत देखील नेहमी वाद व्हायचे. माहेरी लग्न असल्यामुळे पत्नीचा भाऊ अभिषेक मिश्रा तिला घेऊन जाण्यासाठी आला होता.
संतापलेल्या संजयने दरवाजा उघडताच त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी अभिषेकच्या हाताला लागली. त्यात तो जखमी झाला. त्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची महिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण आरोपी पत्नी आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. जवळपास दहा तास हे सर्व सुरू होतं. त्यानंतर माजी सैनिकाच्या तावडीतून कुटुंबीयांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.