नवी दिल्ली - लखनौमधील एका 16 वर्षीय मुलाने पबजी गेम आई खेळू देत नाही म्हणून रागाच्या भरात तिची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आता पोलीस तपासात भयंकर माहिती समोर येत आहे. रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अल्पवयीन मुलाने आपल्या आईची हत्या केल्यानंतर रात्री 2.30 वाजता बहिणीने शेजाऱ्यांकडे मदत मागितली होती. बहिणीने शेजाऱ्यांच्या दरवाजाची बेल वाजवली होती. पण तितक्यात तिचा भाऊ आला आणि त्याने रागाच्या भरात बहिणीला टॉयलेटमध्ये बंद करून ठेवलं.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, भाऊ जेव्हा घराबाहेर गेला होता. तेव्हा मदत मागण्यासाठी मी शेजारी राहणाऱ्या लोकांच्या दरवाजाची बेल वाजवली. पण दरवाजा उघडला नाही. तेव्हाच दादा आला आणि मला ओरडला. रागाच्या भरातच त्याने मला टॉयलेटमध्ये बंद केलं. त्यानंतर सकाळी मला बाहेर काढलं आणि मॅगी खायला दिली. तुला जर जिवंत राहायचं असेल तर गप्प बस अशी धमकी देखील दिली. दुसऱ्याच व्यक्तीने आईला मारल्याचं सांगितलं. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येची माहिती मिळताच आम्ही घरी पोहोचलो. तेव्हा बहीण-भाऊ जोरजोराने रडत होते.
एक काका घरामध्ये आले आणि त्यांनी आईला मारलं अशी माहिती मुलांनी दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता मुलानेच आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गोळी मारल्यानंतर जवळपास 10 तास आई जिवंत होती. पण आरोपी मुलगा तिची तडफड पाहत राहिला. आठ वेळी त्याने तिचा श्वास तपासला. मुलाने आईची रात्री दोन वाजता गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली दिली. तसेच आपली आई दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत जिवंत होती. या कालावधीमध्ये आपण आठवेळा खोलीचे दार उघडून ती जिवंत आहे की मेली याची खात्री केल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली आहे.
गोळ्या झाडल्यावर 10 तास जिवंत होती आई; 'तो' तिची तडफड पाहत राहिला, 8 वेळा तपासला श्वास
अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ADCP), कासीम अब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मृत साधनासिंग यांची हत्या करणाऱ्या 16 वर्षीय मुलाची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्याने सांगितलं की, शनिवारी 4 जून रोजी रात्री तो आई आणि बहिणीबरोबर एकाच खोलीत झोपला होता. हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुलदेखील त्याच खोलीच्या कपाटात ठेवलेलं होतं. आईच्या उशीखालची चावी काढून त्याने दोन वाजण्याच्या सुमारास कपाटातून पिस्तुल घेतलं. पिस्तुलासोबतच मॅगझिन आणि गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. हात थरथर कापत असतानाही त्याने गोळ्या भरल्या होत्या."
"हाताचा थरकाप झाल्याने तीन गोळ्या जमिनीवर पडल्या. तरीही तो पिस्तुल घेऊन आईकडे गेला. त्याची 10 वर्षांची बहीणही आईसोबत पलंगाच्या उजव्या बाजूला झोपली होती. बहीण ज्या बाजूला झोपली होती त्याच बाजूने त्याने गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून बहीण घाबरून उठली. पण त्याने तिचे तोंड दाबून तिला स्वत:च्या दिशेने ओढले."आरोपी मुलाने पोलिसांना सांगितलं की, गोळी झाडल्यानंतर आई पलंगावरच तडफड करू लागली. तिला त्या अवस्थेत सोडून तो बहिणीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. तो आईच्या मृत्युची वाट बघू लागला. दर तासाला खोलीत जाऊन आईच्या मरणाची वाट बघत होता. 10 तासांत आठ वेळा त्याने आईचा श्वास तपासला. दुपारी 12 वाजता त्याच्या आईने जीव सोडला.