पुणे : बाणेर पाषाण प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हत्येची तुरुंगात असलेल्या गुंडाला सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी गुंड अनिल यशवंते आणि त्याचे साथीदार व सुपारी देणार्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नगरसेवकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २२ व २३ डिसेंबरच्या दरम्यान घडली. या नगरसेवकांच्या मुलाला एकाने फोनद्वारे व समक्ष भेटून तुमच्या वडिलांवर खुनी हल्ला करण्यासाठी बाणेरमध्ये काही मुले आले असल्याची माहिती दिली. हे काम करण्याची सुपारी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला गुंड अनिल यशवंते याला देण्यात आल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. या नगरसेवकाची पत्नी रात्री घराचे गेट बंद करत असताना गेटजवळ एक पांढर्या रंगाची चार चाकी गाडी उभी होती. त्यामध्ये वाहनचालक व मागे एक व्यक्ती शॉल गुंडाळून बसलेली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीने कोण पाहिजे असे विचारल्यावर ते काही उत्तर न देता गाडी सिव्हर्स घेऊन निघून गेले. मुलाला मिळालेली माहिती आणि घरासमोर घडलेला हा प्रकार या लक्षात घेऊन या नगरसेवकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी १२० ब, ११५, ५०६/२, ३४ कलमांखाली गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.