- अझहर शेख नाशिक : ‘केवायसी अपडेट’ करा अन्यथा तुमचे बँक खाते ब्लाॅक केले जाईल, मी एचडीएफसी बँकेतून अधिकारी बोलतोय...’ असा संवाद साधत बँकेचे खाते क्रमांक सांगून विश्वास संपादन केला. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर एकापाठोपाठ एक चार मेसेज पाठवून त्याद्वारे आलेले ओटीपी विचारून सुमारे दोन लाख रुपयांना काही मिनिटांतच गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सिडकोमध्ये घडला.
पुणेकर असलेले ज्येष्ठ नागरिक विजयकुमार गोविंदराव ठुबे (६२,रा.पुणे) हे सार्वजनिक बांधकाम विभागातून कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. नाशिकमध्ये रविवारी (दि.११) नातेवाईकांकडे आले होते. यावेळी त्यांच्या माेबाईलवर फोन आला. संबंधिताने त्यांना केवायसी अपडेट करावयाचे सांगून बँकेच्या खातेक्रमांक सांगितला. खाते कुठल्या बँकेत आहे, त्या बँकेचे म्हणजेच एचडीएफसीचे नावदेखील सांगितले. यामुळे ठुबे यांनाही विश्वास पटला. त्यांनी त्या बनावट बँक अधिकारी अर्थात सायबर गुन्हेगाराच्या सांगण्याप्रमाणे आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लीक केले.
यावेळी मोबाइलवर आलेले ओटीपी त्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये सायबर गुन्हेगाराने ऑनलाइन परस्पर त्याच्या बँक खात्यात वर्ग करुन घेतले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अर्ध्या तासात सायबर पोलीस ठाणे गाठले. तेथे घडलेला प्रकार वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांना सांगितला. त्यांनी त्वरित बँक खात्याबाबतची माहिती घेत बँकेशी संपर्क साधून माहिती कळविली. याप्रकरणी ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सायबर पोलिसांनी संशयिताविरुद्ध तसेच बँकेविरुद्ध फसवणुकसह गोपनीय माहिती गहाळ होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्यादीवरून चा गुन्हा दाखल केला आहे.चारवेळा काढले ५० हजारसंशयित सायबर गुन्हेगाराने चार मेसेज ठुबे यांच्या मोबाइलवर एकापाठोपाठ काही मिनिटांच्या अंतराने पाठविले. यावेळी आलेले ओटीपीबाबत त्यांच्याकडून विचारणा केली. यानंतर ५० हजार रुपये याप्रमाणे एक लाख ९९ हजार ३४२ रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग करून घेतले. त्यांना सुरुवातीला ‘एचडीएफसीमधील तुमचे खाते आम्ही आज ब्लॉक करत आहोत. तुम्ही लवकर तुमचा पॅन कार्डची माहिती पुढील लिंकद्वारे अपडेट करा’ असा मेसेज इंग्रजीतून प्राप्त झाला होता.बँक खात्याची माहिती गहाळ होतेय?माझे खाते एचडीएफसी बँकेत आहे व माझा खाते क्रमांक अमुक-अमुक आहे? याबाबतची माहिती संबंधित संशयितापर्यंत कशी पोहचली? असा प्रश्न ठुबे यांनी दिलेल्या तक्रारीत उपस्थित केला आहे. बँकेकडे असेलेली खातेधारकांची माहिती कुठेतरी काेणत्यातरी मार्गाने गहाळ होत असल्याचा संशयही त्यांनी तक्रारीत व्यक्त केला असून आमचा तपास त्या दिशेनेही सुरु असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी सांगितले.