औरंगाबाद : अश्लाघ्य प्रश्न विचारल्यामुळे अल्पवयीन मुलीने धावत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या चालकाने पत्नीसोबत घरात भांडण झाल्यामुळे तणावात दारू ढोसली. नशेतच मुलीसोबत अश्लाघ्य बोललो, अशी कबुली पोलिसांच्या चौकशीत दिली. आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी सांगितले.सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. कैसरबाग, पडेगाव) या चालकाने गोपाल टी येथून रिक्षात बसलेल्या अल्पवयीन मुलीला कौटुंबिक माहिती विचारल्यानंतर शाळा, कॉलेज, क्लासविषयी जाणून घेतले. त्यानंतर त्याने तिला लज्जा वाटेल अशा भाषेत अश्लाघ्य प्रश्न विचारला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून रस्त्यावर उडी घेतली. यात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तत्काळ रिक्षाचा शोध घेत चालक सय्यद अकबर यास बेड्या ठोकल्या.
तीन दिवसांची कोठडी पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, तपास अधिकारी अमाेल सोनवणे यांच्यासह पथकाने आरोपीस न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपी सय्यद अकबर यास तीन मुली असून, सर्वांत मोठी मुलगी १४ वर्षांची आहे.