पाटणा - बिहारमध्ये दरोडेखोरांनी थेट एका न्यायाधीशाच्या घराला लक्ष्य केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथे घडला आहे. बिक्रमगड विभागातील न्यालयातील सिव्हिल जज महेश्वरनाथ पांडे यांच्या निवासस्थानी दिवसाढवळ्या आलेल्या तीन दरोडेखोरांनी दरोडा घालून ऐवज लुटला.
न्यायमूर्ती पांडे हे कोर्टात गेले असताना दरोडेखोर त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी न्यायाधीशांचा शोध घ्यायला सुरुवात केली. न्यायाधीशांची पत्नी गुंजा देवी यांनी सांगितले की, जजसाहेब कोर्टात गेले आहेत. त्यानंतर तिघांनीही पिण्याचे पाणी मागितले. मात्र न्यायाधीशांच्या घरातील मोलकरीण पाणी आणण्यासाठी गेली असताना तिन्ही दरोडेखोरांनी न्यायाधीशांच्या पत्नीला बंधक बनवले आणि मारहाण सुरू केली. त्यानंतर दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये आणि पत्नीचे दागिने काढून घेतले. तसेच पाच वर्षांच्या मुलीलाही मारहाण केली.
न्यायाधीश महेश्वर पांडे यांनी सांगितले की, ५० हजार रोख रकमेशिवाय सुमारे २ लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट झाली आहे. तसेच माझी पत्नी आणि मुलांनाही मारहाण झाली आहे. ज्यावेळी दरोडेखोरांनी न्यायाधीशांच्या सरकारी निवासस्थानावर हल्ला केला तेव्हा घरामध्ये न्यायाधीशांची पत्नी आणि मुलीसह मोलकरीण होती. दिवसाढवळ्या तिघांनाही ताब्यात घेत ही लूट करण्यात आली. दरोडेखोर गेल्यावर न्यायाधीशांच्या पत्नीने जेव्हा याबाबतची हकिकत सांगितली तेव्हा खळबळ उडाली.
घटनास्थळावर बिक्रमगंज पोलीस ठाण्यातील पोलिसांबरोबरच इतर अधिकारी पोहोचले. तसेच अनेक न्यायालयीन अधिकारीही घटनास्थळावर पोहोचले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने सुरक्षेच्या सर्व दाव्यांची पोलखोल केली आहे. न्यायाधीशांसाठीची सरकारी निवासस्थाने काहीशा आडवाटेला आहेत. तसेच या परिसरात याआधीही गुन्हेगारांना फिरताना पाहण्यात आले होते. न्यायालयीन अधिकाऱ्यांनी अनेकदा यासाठी सुरक्षेची मागणी केली होती.