लातूर - लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने स्वत:च्या फायद्यासाठी ६७ लाख ९२ हजार रुपये वापरून अफरातफर केल्याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस ५ मार्च रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर तानाजी जाधव यांनी चाकूर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, सतीश शेषेराव जाधव (रा. बँक कॉलनी, बार्शी रोड, लातूर) हे ४ डिसेंबर २०१० ते ४ ऑगस्ट २०१२ या कालावधीत जिल्हा बँकेच्या नळेगाव येथील शाखेत शाखाधिकारी म्हणून होते. तसेच ते जिजाऊ नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांचे वैयक्तिक खाते नळेगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत असून, पतसंस्थेचे खातेही जिल्हा बँकेच्या लातुरातील दत्तनगर येथील शाखेत आहे.
बँक प्रशासनाने आयबीपी व्यवहार मुख्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय करू नये असे आदेश दिले असतानाही सतीश जाधव याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुख्य कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता आयबीपी व्यवहार केला. तसेच त्याने २५ फेब्रुवारी २०१२ ते २८ जुलै २०१२ या कालावधीत अधिकाराचा गैरवापर करून ६७ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरून बँकेचे नुकसान केले. तसेच पैशांची अफरातफर केली. त्यावरून सतीश जाधव याच्याविरुद्ध २ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास ५ मार्च रोजी अटक केली करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.