नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये स्थानिक पत्रकार सुधीर सैनी (Sudhir Saini) यांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. गाडी ओव्हरटेक केल्याच्या वादातून झालेल्या भांडणात सुधीर यांना आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पत्रकाराचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सुधीर सैनी यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार सुधीर सैनी हे सहारनपूरच्या कोतवाली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चिलकाना रोडवरून बाईकवरुन सहारनपूरला येत होते. तेथे सुधीरची ओव्हरटेकिंगवरून कारमधील तीन तरुणांशी बाचाबाची झाली. त्यानंतर कारमधील तरुणांनी सुधीरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सुधीरला जबर दुखापत झाली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुधीर सैनी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई सुरू केली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या कारच्या क्रमांकावरून कार थांबवली आणि कार ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सुधीरचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे. एसएसपी आकाश तोमर यांनी सांगितले की, रोड रेजमध्ये पत्रकार सुधीर सैनी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या जहांगीर आणि फरमान यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपींवर कारवाई केली जाईल. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.