लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गाडी चालविण्यास शिकवता-शिकवता तो दुसऱ्याच्याच पत्नीच्या प्रेमात पडला. परंतू, जेव्हा तिचा पती प्रेमाचा अडसर ठरू लागला तेव्हा मात्र त्यानं टोकाचा निर्णय घेऊन तिच्या पतीलाच कायमचं यमसदनी धाडलं. ही धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील फरासवाडी येथे मंगळवारी रात्री घडली. विशेष म्हणजे, या खूनप्रकरणाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत करून आरोपीच्या मुसक्याही आवळल्या.
फिरोज चांद मुलाणी (वय ३७, सध्या रा. फरासवाडी-कोंडवे, ता. सातारा, मूळ रा. कडेगाव, जि. सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिरोज हा काही महिन्यांपूर्वी गावी होता. त्यावेळी त्याची पत्नी माहेरी फरासवाडी येथे राहण्यास आली. तेव्हा त्याच गावात राहणाऱ्या शकील निजाम फरास (वय ४२) याच्यासोबत तिची मैत्री झाली. वेळ मिळेल तेव्हा शकील हा तिला दुचाकी चालविण्यास शिकवू लागला. गाडी चालविण्यास शिकवता-शिकवता तो तिच्या प्रेमातच पडला. दोघे अधूनमधून भेटू लागले; पण झालं उलटंच. तिचा पती फिरोज मुलाणी हा सांगलीहून फरासवाडीत इथं राहण्यास आला. सेंट्रिंगचे काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, शकीलला तिला भेटता येत नव्हते. त्यामुळे शकीलनं फिरोजचा ईद दिवशीच कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी सकाळी फिरोज आणि शकील हे दोघे भेटले. दिवसभर दोघेही दारूच्या नशेतच होते. शकील हा अंधार कधी पडतोय, याची वाट पाहू लागला. कोंडवे गावापासून जवळच असलेल्या कॅनॉलवर फिरोजला तो रात्री साडेआठनंतर घेऊन गेला. दारूच्या नशेत तरर्र व बेसावध असलेल्या फिरोजच्या डोक्यात अचानक त्याने कोयत्याने सपासप वार केले. हे वार वर्मी बसल्याने फिरोजचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला. जेणेकरून मृतदेह पाण्यातून वाहत जाऊन त्याचा पुरावा नष्ट होईल, असा त्याचा बेत होता. मात्र, बुधवारी सकाळी मृतदेह कॅनॉलशेजारी अडकलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसल्यानंतर ही खुनाची घटना समोर आली.
असा झाला उलगडा..फिरोजचा खून झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला त्याच्या पत्नीवरच प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी तिच्या बोलण्यातून हे अनैतिक प्रकरण समोर आलं. तिनंही हे कृत्य शकीलनं तर केले नसेल ना, अशी शंका पोलिसांकडे बोलावून दाखविली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह त्यांच्या टीमने तातडीने शकीलला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रेम प्रकरणाची कहाणी पोलिसांसमोर कथन केली.