नवी दिल्ली - हरियाणामधील यमुनानगर येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये दुबईहून परतलेल्या पवन याची ६ मार्च रोजी हत्या झाली होती. त्याचा मृतदेह ८ मार्च रोजी पवनचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह मिळाला होता. आता तब्बल तीन महिन्यांनंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलीस याला ब्लाईंड मर्डर म्हणत होते. त्याचे कुठलेही पुरावे मिळत नव्हते, अशा परिस्थितीत आरोपीचा फोन बंद आला आणि पोलिसांना संशय आला.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शेतामध्ये नोकराचं काम करत होता. तसेच त्याचे मृत व्यक्तीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. पवन हा दुबईहून परत आला तेव्हा तो या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरू लागला. त्यामुळे नोकराने कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली.
हे प्रकरण सुरुवातीला पोलिसांसाठी ब्लाईंड मर्डर होते. कुटुंबीयांना कुणावरही संशय नव्हता. ना कुणासोबत वादाचा विषय होता. मात्र शेतामध्ये काम करणारा नोकर नंदकिशोर उर्फ अमन घटनेपासून बेपत्ता होता. त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. दरम्यान, तो गुपचूप गावात आला असून, आपलं सामान घेऊन फरार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीमध्ये त्याने सारे काही सांगून टाकले आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला. नंदकिशोर हा मुळचा झारखंडमधील आहे. पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकल्या आहेत.