ठाणे : उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पाच्या नावाखाली काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. त्यांच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी शुक्रवारी दिली.
घोडबंदर रोडवरील आनंदनगर, कावेसर भागातील एका स्पा सेंटरमध्ये स्पा आणि मसाज पार्लरचे मालक, तसेच त्यांचे साथीदार हे असाह्य गरीब महिलांना पैशाच्या आमिषाने फूस लावून मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करून घेतात, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ली पोश युनिसेक्स स्पा सेंटरमध्ये २४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने सापळा लावून बनावट ग्राहकाच्या मदतीने दोन महिला, तसेच एक पुरुष दलाल अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका केली. या तिघांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आणखी कोणत्या महिलांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी दोन वेळा लावले सापळे...सध्या ठाणे गुन्हे शाखेच्या वतीने महिलांविरुध्दच्या गुन्हयाची मोहीम सुरु आहे. ठाणे शहरातील उच्चभ्रू वस्तीमधील स्पा आणि मसाज पार्लरचे मालक असहाय्य महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांच्या मार्फतीने सेक्स रॅकेट चालवित असल्याबाबतच्या तक्रारी ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाकडे गेल्या काही दिवसांपासून आल्या होत्या. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने या पथकाने अशाच काही भागांमध्ये यापूर्वी दोन वेळा सापळे लावले होते. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच असे रॅकेट चालविणारे पोलिसांनी हुलकावणी देत होते. मात्र, गुरुवारच्या या कारवाईमध्ये अखेर दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली.