सिमला - प्रेमात फसवणूक झाल्यानंतर अनेक लोक मनातून तुटून जातात, त्यांना धक्का बसतो. प्रेमप्रकरणात धोका मिळाल्यानंतर समाज, पोलीस आणि न्यायालय अशा तिघांकडूनही अपेक्षाभंग झाल्यानंतर अशी व्यक्ती करणार तरी काय? असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका घटस्फोटित महिलेने तिच्या माजी प्रियकराची वरात निघाल्यावर गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, या महिलेने १२ पानी सुसाई़ड नोट लिहून आपली करुण कहाणी मांडली आहे.
मृत महिला ही कोतवाली बाजार धर्मशाला येथील राहणारी होती. तसेच ती कांगडा येथे ब्युटी पार्लर चालवत होती. सदर महिला ३५ वर्षांची होती. तसेच तिचा २०१३ मध्ये घटस्फोट झाला होता. सदर महिला कांग्रा येथील छोटी हडेल पंचायतीच्या जोगीपूर येथे भाड्याच्या घरात राहत होती. यादरम्यान, तिची भेट एका तरुणासोबत झाली. तसेच दोघेही एकत्र राहू लागले. तसेच या युवकाने महिलेला लग्न करण्याचे आश्वासनही दिले.
मात्र हा तरुण या महिलेला फसवत होता, त्यामुळे या महिलेने तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर सदर तरुणाला १७ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली. सध्या तो जामिनावर बाहेर होता. यादरम्यान, त्याचा विवाह ठरला आणि त्याची वरात निघताच महिलेने आत्महत्या केली. आता पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
१२ पानांच्या सुसाईड नोटमधून सदर महिलेने आपली करुण कहणी मांडली आहे. त्यामध्ये तिने आपली मुलगी आणि आई वडिलांची माफी मागितली आहे. तसेच या महिलेने सांगितले की, कांग्रा पोलिसांनी तिने केलेल्या आरोपांकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. २९ मार्चला ती पहिल्यांदा कांग्रा पोलीस ठाण्यात गेली. तिथून तिला धर्मशाला येथील वुमन सेलकडे पाठवण्यात आले. एसएचओने तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तसेच ती विवाहित असून, विवाहाच्या आमिषामध्ये फसल्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. सदर महिला आणि तरुण हे लिव्ह इनमध्ये राहत आहेत. त्यामुळे असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. खूप प्रयत्नांनंतर गुन्हा दाखल झाला. मात्र अटकेनंतर सदर तरुणाला २२ दिवसांतच जामीन मिळाला, असे या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.