- नितिन पंडीत भिवंडी - नाशिक मार्गे मुंबई येथे हवाला मार्गे रोख ४५ लाख रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या कार चालकास मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नाशिक मुंबई महामार्गा वरील हायवेदिवे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपा समोर तिघा अज्ञात इसमांनी अडवून पोलीस असल्याचे सांगत त्याच्या ताब्यातील ४५ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्या प्रकरणी नारपोली पोलिसांनी एक आरोपीस पुणे येथून अटक केली आहे. तर या गुन्ह्यात समावेश असलेले पुणे दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत तीन आरोपी पोलीस कर्मचारी फरार झाले आहेत. पोलिसांनी पोलिसां विरोधात लुटमारी प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे ८ मार्च रोजी आपल्या ब्रिझा कार मधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील ४५ लाख रोकड घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले असता नारपोली पोलीस ठाणे हद्दीत हायवे दिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन इसमांनी कार थांबवून कार मधील रोकड घेऊन पोबारा केला होता . याप्रकरणी १० मार्च रोजी रात्री उशिरा नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला असता तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे येथून बाबूभाई राजाराम सोळंकी यास ताब्यात घेतले असता या गुन्ह्याची उकल झाली. त्याकडे कसून चौकशी केली असता पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे,गणेश कांबळे,दिलीप पिलाने यांचा सहभाग निश्चित झाला .या तिघा जणांनी कार चालकास थांबवून त्याकडील रक्कम लुबाडली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सध्या हे तिन्ही आरोपी पोलीस कर्मचारी फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सूत्राने दिलेल्या महिती नुसार आरोपी असलेले हे तिन्ही पोलीस कर्मचारी गुन्हा करताना आपल्या सेवेवर कार्यरत असल्याचे समोर येत असून रात्री ११ वाजता त्यांनी पुणे ते भिवंडी प्रवास करून सकाळी ४ वाजता ते गुन्हा घडलेल्या ठिकाणी दबा धरून बसले होते . व गुन्हा करून माघारी पुन्हा पुणे येथे कामावर हजर झाले होते . या तिघांनी लुटी मधील प्रत्येकी नऊ नऊ लाख रुपये आपापसात वाटून घेतल्याची माहिती मिळत आहे .