लखनौ - उत्तर प्रदेशमधील ललितपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने जिल्ह्यातील २८ जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे. या मुलीने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. मुलीने आरोप केलेल्या व्यक्तींमध्ये तिचे वडील, नातेवाईकांसह काही बड्या राजकारण्यांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. (Lalitpur rape case)
ललितपूर जिल्ह्यातील सदर कोतवाली क्षेत्रात राहणाऱ्या या मुलीने तिच्या वडिलांवर आणि कुटुंबातील अन्य काही सदस्यांवर तिला वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, ललितपूरमधील काही नेत्यांवरही या प्रकरणात आरोप झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला. मुलीने केलेल्या आरोपानुसार ती सहावीत असताना वडील आणि काही नातेवाईकांनी तिच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करण्यास सुरुवात केली. अनेकदा तिने याला विरोध केला. मात्र तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिला गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
पीडित मुलीने याबाबत वडील आणि नातेवाईकांवरही गंभीर आरोप केले आहेत. वडील आणि नातेवाईकांनीही आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच काही नेत्यांसह एकूण २८ जणांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. आपल्याला ४-५ वर्षे कैदेत ठेवून लैंगिक शोषण करण्यात आले, असा दावा या मुलीने केला आहे. अखेरीस कसाबसा धीर करून मी याची तक्रार पोलिस अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर माझी मुक्तता करण्यात आली, असे या तरुणीने म्हटले आहे.
या तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तिलक यादव, राजू यादव, महेंद्र यादव, अरविंद यादव, प्रबोध तिवारी, सोनू समैया, राजेश जैन, महेंद्र दुबे, नीरज तिवारी, महेंद्र सिंघई, दीपक अहिरवार, कोमलकांत सिंघई, काका आणि नातेवाईकांसह एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी मुलीच्या संरक्षणासाठी कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. या प्रकरणात तपास सुरू करण्यात आला असून, आरोपींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.