कोलकाता - राज्यात सध्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र, पश्चिम बंगामध्ये 10 वीच्या परीक्षेदरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या अल्पवयीन पत्नीने दहावीच्या परीक्षेला हजेरी लावल्याने संतप्त पतीने पत्नीच्या अंगावर तेजाब ओतल्याची घटना उघडकीस आली आहे. बीरभूम जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर मंगळवारी ही घटना घडली.
पतीची इच्छा नसतानाही पीडित मुलीने लग्नांतरही दहावीच्या परीक्षेची तयारी केली होती. तसेच, परीक्षा देण्यासाठी ती परीक्षा केंद्रावरही पोहोचली. त्यामुळे, पतीने पत्नीवर तेजाब फेकले. सध्या पीडित मुलगी सरकारु रग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीचा चेहरा आणि त्याखालील काही भाग मोठ्या प्रमाणात जळाला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
कोरोना महामारीमुळे कमी वयातच लग्न करण्याची आणि शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ या अल्पवयीन मुलीवर आली होती. मात्र, पुढे शिक्षण सुरूच ठेवण्याचा निर्णय तिने घेतला. पण, तिच्या या निर्णयाला पतीचा विरोध होता. त्यामुळे, आपल्या आई-वडिलांच्या घरी येऊन तिने दहावीच्या परीक्षेची तयारी केली होती. त्यानंतर, परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर तिच्या पतीने तिथे जाऊन मुलीवर अॅसिड हल्ला केला. याप्रकरणी पीडित मुलीने जवाब दिला आहे.
पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने सांगितले की, सुरुवातीपासूनच माझ्या शिक्षणाला पतीचा विरोध होता. त्यामुळे, मी माझ्या वडिलांच्या घरुनच परीक्षेची तयारी करत होते. मंगळवारी पतीने मला फोन करुन परीक्षा केंद्र कोठे आहे, हे विचारले. त्यानंतर, मी परीक्षा केंद्रावर मित्रांममवेत असताना पती तिथे आला. त्याने, परीक्षा न देण्याचे सूचवले. पण, मी परीक्षा देणारच असल्याचे सांगताच त्याने खिशातून बाटली काढून माझ्या अंगावर ओतली. त्यानंतर, मी बेशुद्ध झाले, असा जबाब पीडित मुलीने दिला आहे.