- अभिनय खोपडे वर्धा - आठव्या वर्गाचे शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकांने चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचार करून पेशालाच काळामा फासला. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर रविवारी उघडकीस आले.. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आरोपी आश्रम शाळेतील अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (५३) याच्या विरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पीडितेचे आई-वडिल चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ते दोघेही दोन महिन्यांपूर्वी हिंगणघाट येथे रहायला आलेत. मुलीची प्रकृती बिघल्याची माहिती मिळाल्यावर पीडितेचे वडिलांनी आश्रम शाळा गाठली. शिवाय मुलीला हिंगणघाट येथे आणले. त्यानंतर मुलीच्या पोटाखाली दुखत असल्याचे तिने शेजारील महिलेला सांगिल्यावर धक्कादायक प्रकार पुढे आला. महिनाभरापूर्वीच दाखल केले होते आश्रम शाळेतमुलीला चांगले शिक्षण मिळावे या हेतूने पीडितेच्या आई-वडिलांनी तिला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेत ७ जुलै रोजी टाकले. पण हिंगणघाट येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडितेच्या वडिलांना ४ ऑगस्टला तुमच्या मुलीची प्रकृती खराब आहे तिला व तिचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही घेऊन जा असे शाळेतून सांगण्यात आले. पण सततच्या पावसामुळे पीडितेचे वडील आश्रम शाळेत थोडे उशीराच पोहोचले. मुलीला सोबत घेऊन हिंगणघाटला परतल्यावर १३ वर्षीय मुलीवर ५३ वर्षीय अधीक्षकांने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले.
अन् शेजारील महिलेच्या लक्षात आला प्रकारपीडितेला तिच्या वडिलांनी हिंगणघाट येथील घरी आणल्यावर घरमालकीनीने मुलीला प्रकृतीबाबत सहज विचारणा केली. अशातच मुलीसोबत काही तरी अनुचित प्रकार झाल्याचे घरमालकीनच्या लक्षात आले. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठण्यात आले. सुरूवातीला पोलिसांनीही घटनास्थळ आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तक्रारीनंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथेही सुरूवातीला हयगय झाल्याने काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आमदारांनी ठाण मांडल्यावर पोहोचले एसपी अन् सीएसअल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच आ. समीर कुणावार यांनी तातडीने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय गाठले. आमदार थेट उपजिल्हा रुग्णालयात पोहोचल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी हिंगणघाट गाठले. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभाग प्रमुख डॉ. मनिषा नासरे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पुन्हा एकदा पीडितेची वैद्यकीय तपासणी केली.
पीडितेला न्याय मिळावा या हेतूने आपण दिवसभर रुग्णालयात हजर होतो. या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. संबंधित आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी देखील आपण पाठपुरवठा करणार आहे. अधीक्षकाकडून अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार ही घटना अतिशय निंदनीय आहे.
- समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट.