नवी दिल्ली - उत्तर बाह्य दिल्ली परिसरात एका तरुणाच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येमध्ये एका अल्पवयीन मुलीचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या अल्पवयीन मुलीनेच हत्येचा कट आखला आणि भाऊ आणि दोन मित्रांच्या मदतीने सदर तरुणाला मारहाण करून त्याची हत्या केली. या घटनेमागे पोलिसांनी इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या संख्येवरून झालेला वाद हे कारण असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.
मात्र अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलिसांकडून या प्रकरणात कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी एक अल्पवयीन तरुणीसह तिचा भाऊ आणि एका मित्राला अटक केली आहे. तर अन्य एक मित्र फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत. बुधवारी ही हत्या करण्यात आली होती.
प्राथमिक तपासामध्ये हत्येमागची दोन कारणं सध्यातरी दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या संख्येवरून वाद किंवा अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्रांसोबत झालेला कुठला तरी जुना वाद असू शकतो. सध्या पोलीस प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. तसेच लवकरच नेमकं कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी सांगितले की, मृत साहिलची या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री होती. तिनेच साहिलच्या हत्येसाठी कट रचला. बुधवारी रात्री तरुणीने आपले दोन मित्र आणि भावांच्या मदतीने साहिलची हत्या केली. साहिलच्या गळ्यावर चाकूच्या खुणा होत्या. साहिलचा रुग्णालयामध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला.