- सदानंद नाईक
उल्हासनगर - नर्सच्या मोबाईल मध्ये आपले आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याच्या संशयातून चक्क डॉक्टरांने नर्सचा मोबाईल चोरून नेण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी डॉक्टरसह चोरट्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी गजाआड केले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर सी ब्लॉक येथील लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये काम जारणाऱ्या एका नर्सच्या मोबाईलमध्ये आपले आक्षेपार्ह फोटो असल्याचा संशय डॉ शहाबुद्दीन शेख याला आला होता. यातून डॉक्टरने मध्यस्थांच्या मार्फत नर्सचा मोबाईल चोरण्याची १० हजार रुपयांची सुपारी आरिफ खान या सराईत चोराला दिली. त्यानंतर आरिफ खान याने ओळखीच्या अरशद खान या तरुणाला २ हजार रुपये देऊन नर्सचा मोबाईल खेचायला सांगितला. दरम्यानच्या काळात ४ एप्रिलपासून ही नर्स सुट्टीवर गेली होती. त्यामुळे ९ एप्रिल रोजी डॉ. शहाबुद्दीन याने या नर्सला फोन करून हॉस्पिटलला बोलाविले. याबाबतची माहिती डॉक्टराने आरिफ खान याला देऊन, मोबाईल चोरण्याची आठवण करून दिली. त्यानुसार नर्सचा मोबाईल चोरण्यासाठी तिचा पाठलाग आरिफ शेखच्या सांगण्यावरून अरशद याने केला. मात्र तिने घरापासून हॉस्पिटलपर्यंतच्या प्रवासा दरम्यान मोबाईल बाहेर काढला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी १० एप्रिल रोजी पुन्हा एकदा अरशद याने या नर्सचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात नर्सने मोबाईल बॅग बाहेर काढताच अरशदने या नर्सचे केस ओढत तिचा मोबाइल खेचून तेथून पळ काढला.
नर्सने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी तांत्रिक तपास करून अरशद खानसह आरिफ खान व डॉ शहाबुद्दीन शेख या तिघांना मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच चोरट्याने चोरलेला मोबाईल फुटलेल्या अवस्थेत पोलिसांनी जप्त केला. डॉ शहाबुद्दीन याचे बिंग फुटल्यावर त्याने तब्येतीचे कारण पुढे केले. दरम्यान त्याच्यावर पोलीस संरक्षणात त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले. ठणठणीत तब्येत झाल्यावर डॉक्टरसह तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.