नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. तिकिटावरून सुरू झालेला छोटासा वाद टोकाला गेला आणि 300 रुपयांसाठी एका व्यक्तीने जीव गमावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींने तब्बल 11 वेळा अंगावर कार घालून व्यक्तीची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये ही भयंकर घटना घडली आहे. अवघ्या 300 रुपयांसाठी एका ट्रॅव्हल एजंटची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नितीन शर्मा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचं रिझर्व्हेशन रद्द करताना 300 रुपये दंड घेतल्याच्या कारणावरून गावातील दोन भावांनी नितीन शर्माची हत्या केल्याचं समोर आलं आहे. गावात राहणाऱ्या नकुल आणि त्याचा भाऊ अरूण उर्फ छोटू या दोघांनी नितीनच्या अंगावर अकरावेळा गाडी घातली. या घटनेत जखमी झालेल्या नितीनचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. ग्रेटर नोएडाचे अधिकारी विशाल पांडे यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी नकुल याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त केली आहे. फरार असलेल्या अरुणचा पोलीस शोध घेत आहेत.
आरोपींनी नितीनजवळचे दोन मोबाईलही लुटले
नितीन आपल्या कुटुंबासह गावामध्ये राहत होता. तो एक मोबाईल दुकान चालवत होता आणि सोबतच ट्रेन तिकीट रिझर्व्हेशनचं कामही करत होता. साधारण एका आठवड्यापूर्वी गावातील नकुल आणि अरुण या दोन सख्ख्या भावांनी वैष्णवदेवीच्या दर्शनाला जाण्यासाठी ट्रेन तिकीट बुक करून घेतलं होतं. रविवारी रात्री दोघांनी नितीनकडून ट्रेनचं रिझर्व्हेशन रद्द केले. त्या बदल्यात नितीनने ऑनलाइन रिफंडमधून 300 रुपये कापून घेतले. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही भावांनी नितीनचा शोध घेऊन कासना गावाजवळ त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी नितीनजवळचे दोन मोबाईलही लुटले, अशी माहिती मृत नितीनचे वडिलांनी दिली.
नितीनला दोन मुली आणि एक मुलगा आहे
आरोपींच्या तावडीतून कसातरी सुटून नितीन दुचाकीवरून आपल्या गावात पोहोचला. पाठलाग करत असताना आरोपींनी त्याच्या दुचाकीला कारने धडक दिली, त्यामुळे नितीन 100 मीटर अंतरावर जाऊन पडला. त्यानंतर त्यांनी नितीनच्या अंगावर वारंवार कार घातली. हा सर्व प्रकार घडत असताना त्याठिकाणी अनेक लोकांनी गर्दी केली होती. मात्र, कुणीही नितीनला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. काहींनी जखमी नितीनला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातून पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. मृत्यू झालेल्या नितीनला दोन मुली आणि एक मुलगा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.