Crime News: श्रद्धा वालकर हत्याकांडासारख्या दोन जघन्य हत्येच्या घटना मंगळवारी देशात उघडकीस आल्या. आफताब पूनावालाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या केल्याप्रमाणे दिल्ली आणि मुंबईतून अशाच प्रकारच्या या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. दिल्लीत एका व्यक्तीने कथितपणे त्याची लिव्ह-इन पार्टनर निक्की यादवची हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह बाबा हरिदास नगर येथील ढाब्यावर फ्रीजरमध्ये ठेवला आणि त्याच दिवशी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. आरोपी साहिल गेहलोत याला अटक करण्यात आली आहे.
अशीच आणखी एक घटना मुंबईजवळील पालघरमध्ये घडली, जिथे प्रियकराने लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला. मात्र, आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तिन्ही भीषण घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे प्रियकराने आपल्या लिव्ह-इन-पार्टनरची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली. या तिन्ही प्रकरणांवर एक नजर टाकूया...
आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले
आफताब पूनावाला याला 12 नोव्हेंबर रोजी दक्षिण दिल्लीतील मेहरौली परिसरातून श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे सुमारे 35 तुकडे करुन फ्रीजमध्ये तीन आठवडे ठेवले. दररोज मध्यरात्री तो शहरातील विविध भागात हे तुकडे फेकायचा. सध्या आफताब तुरुंगात असून त्याच्याविरोधात खटला सुरू आहे.
साहिलने निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला
हरियाणातील झज्जर येथील एका मुलीचा मृतदेह दिल्लीतील मित्राव गावाच्या बाहेरील ढाब्याच्या फ्रीजमध्ये सापडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी साहिल गेहलोतला मंगळवारी अटक केली. द्वारकाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त विक्रम सिंह यांनी सांगितले की, 14 फेब्रुवारीला सकाळी त्यांना माहिती मिळाली की एका महिलेची हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह गावाबाहेरील ढाब्यात लपवून ठेवला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी साहिल गेहलोत याला पकडण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत असे आढळून आले की, साहिलच्या लग्नात निक्की अडथळा आणत होती, त्यामुळे त्याने निक्कीची हत्या केली.
हत्या करून मृतदेह गादीमध्ये टाकला
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह गादीमध्ये भरून टाकला. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी बेरोजगार होता आणि दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. अशाच एका भांडणाच्या वेळी त्याने पेशाने परिचारिका असलेल्या 37 वर्षीय मेघाचा खून केला. पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, तो आणि मेघा तुळींज परिसरात एकत्र राहत होते. दोघांमध्ये भांडणे व्हायची. अशाच एका भांडणात आरोपीने रागाच्या भरात मेघाचा खून करून मृतदेह बेडमध्ये टाकला. याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.