नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. झाड तोडल्याच्या रागातून जमावाने एक व्यक्तीला बेदम मारल्याचा प्रकार घडला आहे. झारखंडच्या सिमडेगा भागात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. गावाजवळ असणाऱ्या जंगलातील झाड तोडल्याचा आरोप करत एका ग्रामस्थाला गावातील जमावाने अमानूष मारहाण करत जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. संजू प्रधान असं या व्यक्तीचं नाव होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील संजू प्रधान नावाचा तरुण जंगलातून वाळलेली झाडं तोडून त्याचं लाकूड घेऊन जात होता. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला रोखलं आणि जाब विचारला. संजूचं काहीही म्हणणं ऐकून न घेता जमावाने त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. गावातील सुमारे 250 ते 300 जणांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.
ग्रामस्थांनी आई, पत्नीसमोर घेतला तरुणाचा जीव
संजूला गावकरी मारत असल्याचं पाहून त्याची आई आणि पत्नी समोर आल्या आणि गावकऱ्यांना विनंती करू लागल्या. त्याने जरी काही चूक केली असेल तरी त्याला आता सोडून द्या, असं गावकऱ्यांना म्हटलं. मात्र गावकरी काहीही ऐकण्यासाठी तयार नव्हते. काही लोकांनी पोलिसांना याची कल्पना दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र सुरुवातीला ग्रामस्थ पोलिसांनाही गावात येऊ देत नव्हते. पोलिसांना काही अंतर दूरच ग्रामस्थांनी रोखून धरलं.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना
अमानूष मारहाण करूनही ग्रामस्थांचा राग काही शांत झाला नाही. त्यांनी काही लाकडं गोळा केली, ती पेटवली आणि संजूच्या अंगावर ती टाकून त्याला जिवंत जाळलं. पत्नी आणि आईच्या डोळ्यांदेखत संजूला गावकऱ्यांनी पेटवून मारलं. हे पाहून दोघींनाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.