सुधीर राणे, लोकमत न्यूज नेटवर्क | कणकवली (सिंधुदुर्ग): बिबट्याच्या कातड्याची तस्करी होत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग विभागाने सापळा रचून कणकवली तालुक्यातील तळेरे येथे दोघांना ताब्यात घेतले आहे. श्रावण लक्ष्मण माणगावकर, (वय ३७,रा. तळेबाजार,ता.देवगड) ,राजेंद्र पंढरीनाथ पारकर (वय-६०, रा. वळीवंडे, ता. देवगड) अशी त्या दोन संशयितांची नावे आहेत. त्या संशयितांच्या ताब्यातील ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे व ८ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी कार असा सुमारे ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वन्यप्राणी शिकार करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.
४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांना त्यांच्या विश्वासनीय सूत्रांकडून जिल्ह्यात तळेरे येथे बिबट्याच्या कातड्याची तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांकडून कारवाईचे आदेश सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप भोसले यांना देण्यात आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदाराच्या पथकाने तळेरे येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची तपासणी केली असता, एका वाहनामध्ये बिबट्याचे कातडे मिळून आले. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांनुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उप निरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार ए. ए. गंगावणे, पी. एस. कदम, पो. हवालदार के. ए. केसरकर, एस. एस. खाइये, आर. एम. इंगळे यांनी केली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.