नवी दिल्ली - लग्नानंतर अवघ्या 27 दिवसांत पतीच हैवान झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. गुजरात येथून हनिमूनसाठी आलेल्या महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे 27 दिवस झाले होते. हत्या केल्यानंतर पतीने प्रकृती अस्वस्थामुळे मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. पतीने महिलेच्या तोंडात पानं भरली होती. फांदीने गळा आवळून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या वडिलांनी जावयाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपी पतीचा गुजरातमधील वलसाडमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा व्यवसाय आहे.
माउंट अबू पोलीस स्टेशनचे सीओ योगेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय जॉली कुमार, रा. खतलवाडा, वलसाड (गुजरात) हा त्याची पत्नी रुचिका (28) सोबत 10 जानेवारी रोजी माउंट अबूला हनिमूनसाठी आला होता. गुजरात तोरणा भवन येथे ते राहिले होते. 10 जानेवारी रोजी अचानक रुचिकाची तब्येत बिघडली. उलट्या झाल्यानंतर तिला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी रुचिकाला मृत घोषित केले. डॉ.नवीन शर्मा, तनवीर हुसेन आणि कुसुम लता अग्रवाल यांनी रुचिकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा
सरकारी हॉस्पिटलमधील डॉ नवीन यांनी सांगितलं की, रुचिकाच्या मृत्यूनंतर 1 महिना आणि 3 दिवसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. महिलेचे सर्व अवयव बरोबर असल्याचे अहवालात आले आहे. महिलेचा फांदीने गळा आवळून खून करण्यात आला. रुचिकाच्या घशापासून तोंडापर्यंत अनेक पाने भरली होती, त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. महिलेच्या गळ्यात मूठभर पाने भरलेली आढळून आली. रुचिकाचा आधी एका फांदीने गळा आवळण्यात आला. त्यानंतर तिचं तोंड जाड उशीने किंवा इतर कोणत्याही वस्तूने दाबण्यात आलं त्यानंतर हाताने गळा आवळूनही हत्या करण्यात आली आहे.
रुचिताचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर रुचिकाचे वडील हरीश भाई रहिवासी वलसाड गुजरात यांनी गुरुवारी माउंट अबू पोलीस ठाण्यात रुचिताचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हरीशने पोलिसांना सांगितले की, रुचिकाचे गुजरातमध्ये 13 डिसेंबर 2021 रोजी जॉलीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या 24 दिवसांनंतर हे जोडपे गुजरातमधून माउंट अबूला हनिमूनसाठी निघाले होते. अंबाजीचं दर्शन घेतल्यानंतर 7 जानेवारीला त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. यानंतर 9 जानेवारीला फोन करून जॉलीने रुचिकाची तब्येत अचानक बिघडली आणि रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.