कल्याण - व्यसनाधीन असलेल्या मुलाने जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह घरात लटकवून आईने आत्महत्या केल्याचे भासविले. मात्र या हत्येचे बिंग शवविच्छेदन अहवालानंतर उघडकीस आले. ही आत्महत्या नसून मुलानेच आईची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मुलगा रवी पुमणी (३४) याला अटक केली आहे.
कोळसेवाडी पोलिसांना एक माहिती मिळाली. या माहितीनुसार हनुमाननगर परिसरात एका घरात एका ६४ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निशा चव्हाण यांनी या आत्महत्येच्या घटनेचा तपास सुरू केला. मृत महिलेचे नाव सरोजा पुमणी होते. पोलिसांनी सरोजा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घरात सरोजा आणि त्यांचा 34 वर्षीय मुलगा रवी पुमणी राहत होते.
शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी दिलेल्या अहवाल पाहून पोलीस हैराण झाले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. पोलिसानी मुलगा रवी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. नंतर जे वास्तव समोर आले ते धक्कादायक होते. मुलगा रवी हा व्यसनाधीन आहे. नशा करण्यासाठी आईकडून वारंवार पैसे मागायचा. त्यासाठी आई सोबत तो भांडण करायचा. सोमवारी रात्री आई मुलात जोरदार भांडण झाले. यावेळी रवीला दुखापत झाली. रवीने गळा आवळून आईची हत्या केली.
लपविण्यासाठी रवीने आईचा मृतदेह घरात लटकविला. आईने आत्महत्या केल्याचे भासविले. मात्र कोळसेवाडी पोलिसांच्या सखोल तपासाअंती ही हत्या उघडकीस आली आहे. आईची हत्या केली. तेव्हा रवीने त्याच्या बहिणीला मध्यरात्रीस फोन केला होता. मात्र रात्री येणे शक्य नसल्याचे त्याच्या बहिणीने सकाळी येते असे सांगितले होते. त्याची बहीण व मेहूणे हे सकाळी घरी गेले. तेव्हा रवीने दार उशिरा उघडले होते. ही माहिती देखील पोलिसांनी सांगितली.