नवी दिल्ली - लखनौमधील एका 16 वर्षीय मुलाने पबजी गेम आई खेळू देत नाही म्हणून रागाच्या भरात तिची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आता पोलीस तपासात भयंकर माहिती समोर येत आहे. गोळी मारल्यानंतर जवळपास 10 तास आई जिवंत होती. पण आरोपी मुलगा तिची तडफड पाहत राहिला. आठ वेळी त्याने तिचा श्वास तपासला. मुलाने आईची रात्री दोन वाजता गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली दिली. तसेच आपली आई दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत जिवंत होती. या कालावधीमध्ये आपण आठवेळा खोलीचे दार उघडून ती जिवंत आहे की मेली याची खात्री केल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली आहे.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त (ADCP), कासीम अब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मृत साधनासिंग यांची हत्या करणाऱ्या 16 वर्षीय मुलाची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्याने सांगितलं की, शनिवारी 4 जून रोजी रात्री तो आई आणि बहिणीबरोबर एकाच खोलीत झोपला होता. हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुलदेखील त्याच खोलीच्या कपाटात ठेवलेलं होतं. आईच्या उशीखालची चावी काढून त्याने दोन वाजण्याच्या सुमारास कपाटातून पिस्तुल घेतलं. पिस्तुलासोबतच मॅगझिन आणि गोळ्याही ठेवण्यात आल्या होत्या. हात थरथर कापत असतानाही त्याने गोळ्या भरल्या होत्या."
"हाताचा थरकाप झाल्याने तीन गोळ्या जमिनीवर पडल्या. तरीही तो पिस्तुल घेऊन आईकडे गेला. त्याची 10 वर्षांची बहीणही आईसोबत पलंगाच्या उजव्या बाजूला झोपली होती. बहीण ज्या बाजूला झोपली होती त्याच बाजूने त्याने गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून बहीण घाबरून उठली. पण त्याने तिचे तोंड दाबून तिला स्वत:च्या दिशेने ओढले."आरोपी मुलाने पोलिसांना सांगितलं की, गोळी झाडल्यानंतर आई पलंगावरच तडफड करू लागली. तिला त्या अवस्थेत सोडून तो बहिणीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. तो आईच्या मृत्युची वाट बघू लागला. दर तासाला खोलीत जाऊन आईच्या मरणाची वाट बघत होता. 10 तासांत आठ वेळा त्याने आईचा श्वास तपासला. दुपारी 12 वाजता त्याच्या आईने जीव सोडला.
एडीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, साधना यांच्या घरापासून पीजीआय हॉस्पिटल केवळ दोन किलोमीटर इतकं आहे. गोळी लागल्यानंतर त्यांना वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. पोलिसांना वेळीच माहिती मिळाली असती तर फार चांगलं झालं असतं, असंही एडीसीपी म्हणाले. आईची हत्या केल्यानंतर मुलाने तीन दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. पोलिसांनी सांगितलं की, 5 जून रोजी सकाळी बहिणीला खोलीत बंद करून तो आईची स्कुटी घेऊन बाहेर गेला होता. त्यानंतर संध्याकाळी मित्राला घरी बोलवून आणि बहिणीला दुसऱ्या खोलीत बंद करून मित्रासोबत पार्टी केली. मित्राने आईबाबत विचारलं असता ती आजीकडे गेल्याचं सांगितलं.
6 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बहिणीने भूक लागल्याचं सांगितलं. यावर तो शेजाऱ्यांच्या घरी गेला. आई आजीच्या घरी गेली आहे, मला स्वयंपाक कसा करायचा ते कळत नाही. बहिणीला भूक लागली आहे, असं सांगून शेजाऱ्यांकडून तिच्यासाठी जेवण आणलं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता दुसऱ्या एका मित्राला फोन केला आणि पार्टी केली. 7 जून रोजी सायंकाळपर्यंत घरात दुर्गंधी पसरली. त्यामुळे आता ही घटना लपवणं अवघड आहे असं त्याला वाटलं. म्हणून त्याने सायंकाळी सातच्या सुमारास वडिलांना फोन करून हत्येची माहिती दिली. या प्रकरणी नवीनची आई नीरजा देवी यांनी नातवाविरुद्ध सुनेच्या हत्येबद्दल गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे.