मुंबई : कुलाब्यातील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरीला गेलेले कोट्यवधी रुपयांचे वडिलोपार्जित सोन्याचे दागिने २२ वर्षांनी परत मिळाल्यामुळे त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार ८ कोटी रुपये आहे.
कुलाबा परिसरात राहणाऱ्या चराघ दिन फॅशन ब्रँडचे संस्थापक दस्वानी यांच्या घरात ८ मे १९९८ मध्ये ही चोरी झाली. सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत घरात घुसलेल्या टोळीने दस्वानी आणि त्यांच्या पत्नीला बांधून ठेवत, घरातील दागिन्यांवर हात साफ केला. याप्रकरणी गुन्हा नोंदवीत पोलिसांनी चार आरोपींना अटक करीत मुद्देमाल जप्त केला.
अन्य दोन पसार आरोपींचा शोध सुरू केला; पण अजूनही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. १९९९ मध्ये ट्रायलनंतर चौघांना सोडून देण्यात आले होते. या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत हस्तगत केलेला मुद्देमाल परत द्यायचा नाही, असा आदेश मुंबई सत्र न्यायालयाने २००२ मध्ये सुनावणीत दिला होता.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना २००७ मध्ये तक्रारदार अर्जुन दस्वानी यांचे निधन झाले. त्यानंतर दस्वानी कुटुंबीयांचेही याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी अनेक वर्षांपासून जप्त असलेल्या वस्तू तक्रारदारांना परत करण्यासंदर्भात न्यायालयात पाठपुरावा केला. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कुलाबा पोलिसांनी राजू दस्वानी यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांचे वडिलोपार्जित दागिने त्यांना परत केले.
अमेरिकेत असलेल्या बहिणीचाही समान हक्कदस्वानींचे वकील सुनील पांडे यांनी सांगितले की, चोरी झालेल्या वस्तू त्यांच्या पूर्वजांच्या असून, परिवारातील सदस्यांच्या भावना या वस्तूंसोबत जोडल्या आहेत. राजू दस्वानी आणि त्यांच्या दोन बहिणी या संपत्तीच्या कायदेशीर वारस आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या दोन्ही बहिणींनी आधीच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिले असल्याचे नमूद केले आहे.
राणी व्हिक्टोरियाचा फोटो असलेले सोन्याचे नाणे, ब्रेसलेट, १३०० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या विटा, अशा ऐवजांचा यात समावेश होता.